मगो नेते डॉ.केतन भाटीकर यांचा इशारा : 15 जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात वैद्यकीय सुविधा अभावी रुग्णांची चाललेली परवड व फोंडय़ातील खराब रस्त्यांच्या मुद्दय़ावर येत्या 15 जानेवारीपासून आंदोलन छेडण्याचा इशारा मगो रायझिंग फोंडाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी दिला आहे. दिलेल्या मुदतीत फोंडय़ातील जनतेला चांगली आरोग्यसेवा व सुरक्षित रस्ते देण्यास सरकार अपयशी ठरले असून त्याविरोधात स्थानिक आमदार व अन्य कुठल्याही पक्षाचे नेते शब्दही काढीत नाहीत, अशी टिका त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
गोमेकॉच्या वाऱया कधी थांबतील
गेल्या ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांसाठी उपजिल्हा इस्पितळ खाली करताना इतर रुग्णांची कुठलीच गैरसोय होणार नाही. त्यांना सर्व अत्त्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याची हमी आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी दिली होती. आम जनतेसाठी हे इस्पितळ पुन्हा खुले करण्यात आले आहे. मात्र एवढे प्रशस्त इस्पितळ असूनही छोटय़ा मोठय़ा उपचारांसाठी फोंडा तालुका व आसपासच्या भागातील नागरिकांना बांबोळीतील गोमेकॉत जावे लागते. तेथे खाटा उपलब्ध न झाल्यास रुग्णांना बऱयाचवेळा जमिनीवर झोपावे लागते. फोंडा तालुका व शेजारील धारबांदोडा तालुक्यातील शेकडो रुग्ण उपचारासाठी फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात येत असून आवश्यक सुविधांअभावी या रुग्णांची परवड चालली आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या अनेक रुग्णांनी अशा आपत्तकालीन गोमेकॉत न्यावे लागल्याने वाटेतच जीव सोडलेला आहे. गोमेकॉत मिळणाऱया बहुतेक वैद्यकीय सुविधा फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळात येत्या 15 जानेवारीपर्यंत उपलब्ध न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. भाटीकर यांनी दिला.
फोंडय़ातील रस्त्यांसाठी रस्त्यावर या
आरोग्य सेवेबरोबरच फोंडा शहर व आसपासच्या भागातील सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. एकही रस्ता वाहने चालविण्यासाठी सुरक्षीत राहिलेला नाही. नियमित खड्डय़ातून प्रवास करणाऱया वाहन चालकांना कंबर व मानेच्या व्याधी सुरु झालेल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडून फोंडय़ातील रस्ते हॉटमिक्स करणाची केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात मलनिस्सारण प्रकल्पासाठी खड्डय़ांचे खोदकाम संपण्याऐवजी वाढतच आहे, असे डॉ. भाटीकर यांनी यांनी सांगितले. फोंडा तालुक्यासाठी चांगली आरोग्य सेवा व सुरक्षित रस्त्यांच्या मुद्दय़ावर आवाज उठविण्यासाठी आमदार व इतर सर्व पक्षातील नेत्यांनी निदान एक दिवस रस्त्यावर उतरावे, असे आवाहन डॉ. भाटीकर यांनी केले आहे.
फोंडय़ातील जुन्या बसस्थानकावरील सुलभ शौचालयाची दारुण अवस्था झाली असून महिला व अन्य नागरिकांना नाईलाजाने या अस्वच्छ व गलिच्छ अशा स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. जनतेच्या या समस्येकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
विराज सप्रे यांनी फोंडा क्रीडा प्रकल्पवरील मैदान भंगार अड्डा बनल्याने सांगून याठिकाणी येणारे खेळाडू व सायंकाळी चालण्यासाठी येणाऱया ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील व्यायामशाळाही कोरोनाच्या लॉकडाऊननंतर एसओपीच्या नावाखाली बंद ठेवली आहे. थर्टीफस्टच्या पाटर्य़ा व इतर कार्यक्रमांना हे नियम लागू पडत नाहीत. मात्र युवकांची गरज असलेली व्यायामशाळा बंद ठेऊन सरकार त्यांच्यावर अन्याय करीत असल्याची टिका त्यांनी केली.









