जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र : 70 किलोमीटरचा मारक पल्ला, लवकरच होणार समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि इस्रायल यांना संरक्षण क्षेत्रातील स्वतःचे सामर्थ्य वाढविण्यास मोठे यश मिळाले आहे. दोन्ही देशांनी जमिनीवरून आकाशात मारा करणाऱया क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र 70 किलोमीटरच्या परिघात शत्रूला नष्ट करण्यास सक्षम आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य मागील काही वर्षांमध्ये उल्लेखनीय स्वरुपात वाढले आहे.
दोन्ही देशांनी मीडियम रेंज सरफेस-टू-एअर मिसाइलची (एमआरएसएएम) चाचणी मागील आठवडय़ात भारतातच करत शस्त्रयंत्रणेच्या सर्व सुटय़ा भागांची क्षमता पडताळून पाहिली होती. इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजने यासंबंधीची माहिती दिली आहे.
दोन्ही देशांकडून विकसित
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज या दोघांनी मिळून हे क्षेपणास्त्र तयार केले आहे. क्षेपणास्त्र कार्यक्रमात भारत तसेच इस्रायलच्या अन्य संरक्षण कंपन्याही सामील आहेत. एमआरएसएएमचा वापर भारताची तिन्ही संरक्षण दले आणि इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) करणार आहे.
संबंध बळकट होणार
एमआरएसएएम हवाई आणि क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा एक अत्याधुनिक यंत्रणा असून तिने शत्रू किंवा धोक्यांच्या विरोधात स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. हवाई सुरक्षा यंत्रणेची चाचणी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. कोरोना संकटामुळे ही प्रक्रिया अधिकच अवघड ठरली होती. क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिकच बळकट होणार आहेत. चाचणीदरम्यान एमआरएसएएम इंटरसेप्टरला जमिनीवरून मोबाईल लाँचरद्वारे डागण्यात आले, या क्षेपणास्त्राने यशस्वीपणे लक्ष्याचा भेद केल्याची माहिती इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बोज लेवी यांनी दिली आहे.
सामर्थ्य वाढणार
एमआरएसएएम यंत्रणेच्या मदतीने भारतीय सैन्याचे सामर्थ्य मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. याच्या हवाई आणि क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेद्वारे आकाशात शत्रूला नेस्तनाबूत करण्यास यश मिळणार आहे. या क्षेपणास्त्राद्वारे 50 ते 70 किलोमीटरच्या कक्षेत येणारी शत्रूची विमाने नष्ट करता येणार असल्याचे संरक्षणतज्ञांचे मानणे आहे. या क्षेपणास्त्र यंत्रणेत अत्याधुनिक रडार, कमांड अँड कंट्रोल, मोबाईल लाँचर आणि रेडिओ फ्रिक्वेंसी सीकरसोबत इंटरसेप्टरही सामील आहे.