निम्म्याहून अधिक आमदार पक्ष सोडणार : काँग्रेस नेते भरत सिंग यांचा दावा
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारच्या राजकारणात नव्याने खळबळ उडाली आहे. बिहारमधील काँग्रेस नेते भरत सिंग यांनी 11 आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडणार असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. तर काँग्रेस पक्षशेष्ठींनी भरत सिंग यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. राज्यातील नितीश कुमार यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. या विस्तारापूर्वीच महाआघाडीचे आमदार पक्ष बदलू शकतात.
19 पैकी 11 आमदार काँग्रेसच्या पार्श्वभूमीचे नाहीत, या लोकांनी पैशांच्या बळावर उमेदवारी मिळविली आणि आता आमदार झाले आहेत. संख्याबळ वाढविण्यासाठी रालाओ प्रयत्नशील आहे. काँग्रेसचे गटनेते अजित शर्मा हेच पक्षात फूट पाडू इच्छित आहेत. पक्षाला सोडचिठ्ठी देऊ पाहणाऱया 11 आमदारांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा, राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंग आणि वरिष्ठ नेते सदानंद सिंग यांचेच मार्गदर्शन लाभले असल्याचे भरत सिंग यांनी म्हटले आहे.
गोहिल यांना लागला होता सुगावा
बिहारच्या प्रभारापासून मुक्त करण्याची विनंती काँग्रेस नेते शक्ति सिंग गोहिल यांनी दोन दिवसांपूर्वी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना केले होते. पक्षशेष्ठींनी गोहिल यांना बिहारच्या प्रभारापासून मुक्त केले होते. आमदार फुटण्याची जाणीव झाल्यानेच गोहिल यांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
नेतृत्वावर नाराज राजद, काँग्रेस आमदार
राजदचे अनेक आमदार भाजपमध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधत असल्याचा दावा खासदार राकेश सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तर काँग्रेस अन् राजदचे अनेक आमदार रालोआत सामील होण्यासाठी आतुर असल्याचे संजदकडून सांगण्यात आले होते. तेजस्वी यादव यांच्या वर्तनामुळे राजदचे अनेक आमदार नाराज असल्याचे समजते. काँग्रेसचे आमदार स्वतःचे भवितव्य विचारात घेऊन भाजपमध्ये सामील होऊ शकतात. तर राजद आमदारांची पहिली पसंती नितीश यांच्या संजदला असेल.