पवित्र भूमीत तरुणांची ‘बाटली’साठी जीवाची बाजी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीतच पावस येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत कोंबडी, बोकडाबरोबरच बक्षीस म्हणून चक्क मद्याच्या बाटल्याही देण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद समाज माध्यमांवर उमटू लागले आहेत. विशेष म्हणजे एका ‘प्रमुख पाहुण्या’ उमेदवारांनेच खेळाडूंना मद्यांच्या बाटल्याचे वाटप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पावस हे ठिकाण स्वामी स्वरुपानंदाच्या समाधी मंदिर आणि त्यांच्या ग्रंथसंपदेमुळे प्रसिध्दीस व आदरास पात्र ठरलेले असताना याच पवित्र भूमीत मद्याच्या मागे तरुणांना धावताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यातही भर म्हणजे या स्पर्धेत काही राजकीय मंडळींनी पुढाकार घेतल्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांना गैरमार्गाने जवळ करण्याचा हा लाजिरवाणा प्रकार आहे अथवा कसे या बाबतही चर्चा सरु झाली आहे.
सध्या गावोगावी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आह़े ग्रामपंचायत निवडणुकाही तोंडावर आल्याने या स्पर्धांना राजकीय प्रायोजकांचाही मोठा हातभार लाभत आहे. अशातच पावस येथे आयोजित करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत बोकड व कोंबडीसह मद्याच्या बाटल्या बक्षीस म्हणून ठेवण्यात आल्याने या स्पर्धेची चांगलीच चर्चा पावस पंचक्रोशीत सुरु होती. सोशल मिडियामुळे ही चर्चा सर्वदूर पसरल्यानंतर या बाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
या स्पर्धेत विजेत्या संघाला बोकड व मद्याची बाटली बक्षीस देण्यात आल़ी तर उपविजेत्या झालेल्या संघाला 5 गावठी कोंबडे, मद्याची बाटली, मालिकावीराला 2 बॉयलर कोंबडय़ा व मद्यबाटली, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना 1 बॉयलर कोंबडी व मद्याची बाटली बक्षीस म्हणून देण्यात आल़ी आतापर्यत बक्षीस म्हणून प्रथमच मद्याच्या बाटल्यांचे वाटप झाल्याने सुसंस्कृत कोकणची वाटचालीबाबतही चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
पावस हे प्रसिद्ध तिर्थक्षेत्र म्हणून राज्यभर ओळखले जात़े या ठिकाणी अशा प्रकारे तरूण पिढी मद्याची बाटली प्राप्त करण्यासाठी आटापीटा करताना पाहून अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. या स्पर्धेची चर्चा जोरदार रंगल्याने त्याचे अनुकरण इतर ठिकाणीही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े त्यामुळे तरूण पिढीला खेळाच्या माध्यमातून चांगल्या मार्गाकडे नेण्यापेक्षा बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याबद्दल परिसरातील अनेक सुजाण नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. अशा प्रकारे ‘समाजसेवा’ करणाऱया राजकारणी मंडळींना किती थारा द्यायचा, याचाही विचार करावा लागेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. राजकीय नेत्यांसह शासकीय यंत्रणांनीही या बाबत हस्तक्षेप करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









