वाठार किरोली / वार्ताहर :
कोरेगाव तालुक्यातील भिवडी ग्रामपंचायत गावातील सर्व ग्रामस्थ आणि मुंबईस्थित गावाकडील कार्यकर्ते यांच्या विचाराने बिनविरोध झाली. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये एकत्रित जाहीर मिटींग घेऊन त्यामध्ये गेल्या ८ ते १० वर्षापासून गावातील भाव-भावक्यांमध्ये जे वितुष्ट निर्माण झाले होते, ते या बैठकीच्या निमित्ताने संपुष्टात आले. यामध्ये सर्व गावकरी ग्रामस्थांनी गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी आपली ग्रामपंचायत बिनविरोध करणे गरजेचे आहे. याविचाराने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा संकल्प मिटींगमध्ये सर्वानुमते करण्यात आला.
मिटींगमध्ये ज्या उमेदवारांनी गावाच्या हितासाठी माघार घ्यायचे ठरवले होते, त्या उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेतली. यामुळे भिवडी गावच्या एका नवीन विकास पर्वाला सुरुवात झाली. यामध्ये भिवडी ग्रामस्थांनी आणि मुंबईस्थित ग्रामस्थांनी जी विशेष भूमिका ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी पार पाडली. या सर्वांच्या सहकार्याने भिवडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यानंतर गावाचा रखडलेला विकास सर्वांच्या सहकार्याने आणि एकजुटीने मार्गी लावण्याची प्रतिज्ञा सर्वांनी केली. ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने सर्व कार्यकर्ते यांचे आभार ग्रामस्थांनी मांडले .