अर्ज माघार घेण्यासाठी 11 ते 3 वाजेपर्यंत मुदत, त्यानंतर चिन्ह वाटप
वार्ताहर/ कराड
आज सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने प्रत्यक्ष किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर तीननंतर निवडणुक रंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली असून तहसीलदार अमरदिप वाकडे यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱयांना प्रशिक्षण दिले आहे.
कराड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून 104 ग्रामपंचायतींच्या 1024 जागांसाठी एकुण 3039 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 30 अर्ज छाननीत अवैद्य ठरले होते. तर 3009 अर्ज वैद्य ठरले आहेत. आज सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी गावनिहाय मांडलेल्या टेबलवरच त्या त्या गावच्या उमेदवारांना अर्ज माघार घेता येणार आहेत. तर तीन नंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यात 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 17 अंशत: बिनविरोध झाल्या आहेत.
अर्ज माघर व चिन्ह वाटप कार्यक्रमाच्या दृष्टीने तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱयांना प्रशिक्षण दिले. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी निवडणूक विभाग व पोलिस लक्ष ठेवून आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रचार करताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








