कचरा पेटविताना झाला स्फोट, कागल तालुक्यातील बोरवडे येथील घटना
प्रतिनिधी / सरवडे
घरातील कचरा अंगणात पेटविताना त्यामध्ये असलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाला. ही घटना कागल तालुक्यातील बोरवडे येथे घडली. सुनिता धोंडीराम काशीद (वय ४०, रा. बोरवडे दत्तनगर) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, रविवार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुनिता काशीद या घरातील कचरा अंगणात पेटवित होत्या. त्यामध्ये पडलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीचा अचानक स्फोट झाल्याने बाटलीतील सॅनिटायझर त्यांच्या अंगावर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या साडीने पेट घेतला. त्यामध्ये त्या ८० टक्के भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या.
घरातील व शेजारी लोकांनी आग विझवून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गेले आठवडाभर त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु होते. शनिवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. ग्रामसेवक धोंडीराम काशिद यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, दोन मुले, दीर, भावजय असा परिवार आहे. सुनिता काशीद यांच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.