जिंकण्याची क्षमता असलेल्यानांच उमेदवारी
महेश कोनेकर/ मडगाव
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सासष्टीतील मतदारांना भाजपकडे आकृष्ट करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी सासष्टी मिशन राबविले होते. परंतु, त्याला सासष्टीच्या मतदारांनी प्रतिसाद दिला नव्हता. भाजप आता 2022च्या विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने सासष्टी ‘मिशन’ करणार नसल्याची माहिती प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
सध्या भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेतली जात आहेत. या शिबिरांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे मडगावात आले असता, त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजप पुन्हा सासष्टी मिशन करणार नसल्याचे स्पष्ट केले. दर आठ दिवसांनी उत्तर व दक्षिण गोव्याला भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांना तसेच इतर लोकांना भेटण्याचा आपण निर्णय घेतला असून त्यानुसार आपण दक्षिण गोव्यात येत असतो. त्यातून संघटनेची जी काही कामे आहेत, ती करण्याची संधी मिळते. मात्र, त्यांचा संदर्भ कोणीही सासष्टी मिशनशी जोडू नये.
प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरतो
गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी हल्लीच मडगाव पालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना गोवा फॉरवर्डच्या विरोधात सर्व जण एकत्र आले तरी त्यांचा आम्ही सामना करू. गोवा फॉरवर्डवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे विधान केले होते. भाजपच्या उमेदवारांसाठी दोन-तीन मंत्री येऊन प्रचार करतील असे ही त्यांनी म्हटले होते. यासंदर्भात बोलताना श्री. तानावडे म्हणाले की, भाजप कोणीच निवडणूक सहजपणे घेत नाही. प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही मैदानात उतरतो. जिल्हा पंचायत निवडणूक आम्ही जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्याप्रमाणे आम्ही विजय मिळविलेला आहे. आत्ता नगरपालिका निवडणुकाही आम्ही जिंकणारच आहोत. त्यासाठी आम्ही लढणार व जिंकणार. त्याच उद्देशाने भाजप पुढे जात आहे. भाजपचे सर्व विरोधक जरी एकत्र आले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे श्री. तानावडे म्हणाले.
निवडणुका या नेहमीच स्थानिक कार्यकर्त्यांच्या आधारावर जिंकायच्या असतात. आमच्या सारखे बाहेरच कितीही नेते आले तरी निवडणुका जिंकता येत नाही. जर स्थानिक कार्यकर्त्यांनी एखादी सभा किंवा बैठक आयोजित केली तर त्यात मार्गदर्शन करू शकतो. पण, निवडणुका या केवळ स्थानिक कार्यकर्त्यांच्या आधारावर जिंकायच्या असतात हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी तसे होणार नाही
मडगाव पालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोवा फॉरवर्डला शह देण्यासाठी भाजप व काँग्रेसचे नगरसेवक एकत्र आले होते. तरी सुद्धा गोवा फॉरवर्डने बाजी मारली होती. तशाच पद्धतीने गोवा फॉरवर्डला शह देण्यासाठी भाजप-काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का ? असा सवाल उपस्थित केला असता, श्री. तानावडे यांनी यावेळी तसे होणार नसल्याचे स्पष्ट केले.
पक्षीय पातळीवर निवडणुका घेतल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांना पक्षाची बंधने लागतात. सध्या पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर घ्यावी की नाही याचा विचार सध्या सुरू आहे. जरी पक्षीय पातळीवर निवडणुका घेतल्या तरी भाजपला कोणतीच अडचण नाही. फक्त पक्षीय चिन्हामुळे जेव्हा एखादी भूमिका घ्यायची वेळ आली तर अडचण निर्माण होत असते. भाजप व काँग्रेसची विचारसरणी भिन्न आहे. त्यामुळे मडगाव पालिकेत नगराध्यपदाच्या निवडणुकीसाठी जे काही झाले ते योग्य नव्हते. भाजपने आपली वेगळी ओळख ठेवणे महत्त्वाचे आहे. कुणाला तरी धडा शिकविण्यासाठी, असे होता कामा नये असे श्री. तानावडे म्हणाले.
आरोपात तथ्य नाही
जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांना अंधारात ठेवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला होता. या आरोपात काही तथ्य नाही. जिल्हा पंचायतीच्या निवडणुका 22 मार्चला होणार होत्या. मात्र, कोरोनामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या. तरी भाजपचे काम चालूच होते. लॉकडाऊनच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांना मदत केली. पक्षाचे कार्य चालूच ठेवले. भाजपची जमेची बाजू म्हणजे पक्षाचे कार्यक्रम सतत चालूच असतात. आतासुद्धा सासष्टीत तीन ठिकाणी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे चालू आहेत. फातोर्डा मठ संकुलात फातोर्डा, कुडतरी व नुवे. पटीदार सभागृहात वेळळी व नावेली तर मडगावच्या व्हिवा हॉटेलात बाणावली व मडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी शिबिरे घेतली जात आहेत. सात मतदारसंघाचे प्रशिक्षण एकाचवेळी चालू आहेत. भाजप पूर्णवेळ काम करीत असतो. काँग्रेसवाले दुपारी झोपणार व संध्याकाळी काम करणार अशाने पक्षाचे कार्य होत नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी सातत्याने पक्षाचे कार्यक्रम व्हायला पाहिजे. पक्षाच्या केंद्रीय पातळीवरून येणारे सर्व कार्यक्रम पक्ष स्थानिक पातळीवर राबवित असतो, असे श्री. तानावडे म्हणाले.
आता नगरपालिका निवडणुका कधी तरी होणारच आहे ना. त्या घोषित होईपर्यंत वाट पहात थांबणार का ? नाही ना. त्यासाठी तयारी करायला पाहिजे व भाजपची पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सर्व आमदारांना उमेदवारी दिली जाणार का , असा सवाल उपस्थित केला असता, श्री. तानावडे म्हणाले की, सर्व काही त्यांच्यावर अवलंबून आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्ही दक्षिण गोव्यात भाजपने 17 जागा लढविल्या होत्या. आठ काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांसाठी सोडून दिल्या होत्या. त्यांना पक्षाच्या चिन्हावर नको असल्यास अपक्ष लढविण्यास मोकळीक दिली होती. भाजपने 17 पैकी 14 जागा जिंकल्या. उत्तर गोव्यात आम्ही 25 जागा लढविल्या होत्या. त्यातील 20 जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय करावे हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. जर त्यांना जर भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवायची असले तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा लागेल. आम्ही कुणालाही सक्ती करणार नाही. तसेच सध्या तरी कोणाला उमेदवारी द्यावी, न द्यावी याचा पक्षाने निर्णय घेतलेला नाही.
प्रियोळमध्ये निर्णय गोविंद गावडे यांना घ्यावा लागेल
गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रियोळ मतदारसंघातून भाजपने अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांना पाठिंबा दिला होता व त्या पाठिंब्याच्या जोरावर ते विजयी झाले होते. आता 2022 मध्ये होणाऱया निवडणुकीत गोविंद गावडे यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवायची की नाही यांचा निर्णय त्यांनी स्वत: घ्यायचा आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत प्रियोळ मधील दोन्ही जागा भाजप लढविणार असल्याचे भाजपने त्यांना कळविले होते. त्याप्रमाणे, त्यांनी भाजपचे उमेदवार उभे केले व त्यांना गोविंद गावडे यांनी पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट त्यांनी केली. परंतु विधानसभेसाठीचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.
प्रियोळ मतदारसंघात भाजप स्वत:चा उमेदवार उभा करणार का ? असा सवाल केला असता, श्री. तानावडे म्हणाले की, पक्षीय पातळीवर तसा अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या तरी पक्षाने नगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे व प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीच असते हे पक्षाचे धोरण आहे. एकवेळ अशी होती की, भाजपची उमेदवारी घ्यायला कोणी तयार नव्हते. पण, जसा पक्ष वाढत गेला तसे प्रत्येक मतदारसंघात पक्षाचे तीन-चार नेते तयार झाले. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असतो. त्यातूनच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत असतो. हा प्रकार केवळ भाजपमध्येच नव्हे तर काँग्रेस पक्षात सुद्धा आहे. पण, भाजपमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्याच बरोबर जो उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यालाच पक्ष प्राधान्य देत असतो आणि 2022 मध्ये होणाऱया निवडणुकीत भाजप निवडून येऊ शकणाऱया उमेदवारांनाच प्राधान्य देणार असल्याचे अध्यक्ष श्री. तानावडे यांनी स्पष्ट केले.









