प्रतिनिधी / सांगली
पै. रावसाहेब आण्णा शिंदे हे कुस्ती, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात खानापूर घाटमाथ्यावरच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात सुपरिचित असे नाव होते. आपल्या रांगड्या देहाने त्याचबरोबर रांगड्या भाषेने गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्वेषाने आसूड ओढत. एखाद्या बलदंड पैलवानाविरुद्ध कुस्तीत लढायचं असो वा राजकारणात प्रस्थापित नेत्याच्या आण्णा कायमच सर्वसामान्य जनतेच्या सोबत असणार. गोरगरिबांचा तारणहार म्हणून रावसाहेब आण्णांची ख्याती होती. गावाला असलेली कुस्ती परंपरा कायम ठेवून स्वखर्चाने कुस्ती तालीम उभारायला लावणारे रावसाहेब आण्णा यांचे १ जानेवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. बेनापूर ग्रामपंचायत स्थापनेपासून २० वर्षे सरपंच, शेतकरी कामगार पक्षाची खानापूर तालुक्याची धुरा अखंडपणे जपणाऱ्या रावसाहेब अण्णांच्या निधनाने खानापूर तालुक्याच्या कुस्ती, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
बेनापूर गाव म्हणले की पटकन डोळ्यासमोर येतो तो पै. रावसाहेब अण्णांचा चेहरा, बलदंड शरीर आणि रांगड्या ग्रामीण भाषेतील बोलणे. स्वातंत्र्य काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून खानापूर भागात क्रांतीज्योत उभारण्यात आण्णांचा सिंहाचा वाटा होता. इंग्रजी जुलमी राजवटीत इंग्रजांना साथ देणाऱ्या तत्कालीन प्रस्थापितांना प्रति सरकार बनून झटके देण्याचे काम रावसाहेब आण्णांनी केले. देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे ते स्वातंत्र्य हे स्वराज्य नाही. ते गरिबांच्यासाठी नाही. या स्वातंत्र्याने गरीबाच्या चुली पेटत नाही म्हणून प्रस्थापितांच्या विरोधात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर काँग्रेसचा त्याग करून शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली गरीबाच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला.
गोरगरिबांच्या कल्याणासाठी राजकारण करायचं असा आण्णांचा हेका होता. गोरगरीबावर अन्याय झाला नाही पाहिजे ही अण्णांची शिकवण होती. खानापूर, आटपाडी तालुक्यात पै. रावसाहेब अण्णा हे व्यक्तिमत्त्व संघर्षातून उभा राहिले आणि आयुष्यभर संघर्षच केला. कै. बाळासाहेब शिंदेंच्या पोटी जन्माला आलेल्या रावसाहेब अण्णांनी तरुणपणात कुस्तीच्या आखाड्यात पैलवान म्हणून अटकेपार झेंडा रोवला. आपल्या बळाचा वापर गरिबांच्या संरक्षणासाठीच करायचा, गर्वाने मातलेल्या व सामान्य लोकांना छळणाऱ्याचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी उघड भूमिका आण्णा घेत होते. आण्णा आपल्या रांगडी भाषेत राजकारण्यांचा खरपूस समाचार घेत. ग्रामीण रांगड्या वक्तृत्वाचा तो एक वेगळा आविष्कार होता.
खानापूर तालुक्यात कुस्ती क्षेत्रातील इतिहास म्हणून पै. रावसाहेब आण्णांनी उभारलेल्या कै. बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुलकडे पाहिले जाते. आण्णांनी राजकारणात जेवढे नाव कमावले तेवढेच कुस्ती क्षेत्रातही कमावले. त्यांच्या सोबत त्यांचे लहान बंधू स्व.मालोजी आबा ही तालमीत सराव करू लागले. जोड मोठी व्हायला लागल्यानंतर पुढील सरावासाठी सांगलीच्या सरकारी तालमीत वस्ताद नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पै.रावसाहेब आण्णा शिंदे आखाड्यात सराव करू लागले. त्यांनी कुस्तीत अनेक सावर्डेकर (भोसले तालीम) मोतीबाग तालमीतील अनेक तगड्या मल्लांना चितपट केले आहे. पैलवान म्हणून पहावे तर रावसाहेब आण्णाना पहावे असे लोक म्हणत. कुस्ती क्षेत्रासाठी अविरत झटणारे तसेच गोरगरिबांचे कैवारी पै. रावसाहेब आण्णा शिंदेंचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे.








