बहुतांश ठिकाणी अपक्ष उमेदवारही विजयी : गुलालाची उधळण-फटाक्मयांच्या आतषबाजीत केला विजयोत्सव साजरा
वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत निवडणुकीत ग्रामविकास लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी देखील बहुतांश ठिकाणी बाजी मारली असून काही माजी सदस्यांसह नवख्या उमेदवारांनी देखील विजय संपादन करून ग्राम पंचायत सदस्याच्या रूपाने गावच्या राजकीय क्षेत्रात प्रवेश मिळविला आहे.
गावातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे हिंडलग्यासह संपूर्ण तालुक्मयाचे लक्ष येथील निकालाकडे लागून राहिले होते.
याठिकाणी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मन्नोळकर पुरस्कृत ग्रामविकास लोकशाही आघाडी व हिंडलगा ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत रंगली होती. तसेच काही ठिकाणी अपक्षांनी देखील उमेदवारी दाखल करून नशीब आजमावले होते. याशिवाय विजयनगर आणि रक्षक कॉलनी परिसरात स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली होती. पण मतदारांनी अभ्यासू आणि विकासाला प्राधान्य देत सदस्यांची निवड केली आहे.
सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. दुपारी उशिरापर्यंत निकाल हाती येत नव्हता. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शेवटी दुपारी दीड वाजता संपूर्ण निकाल हाती लागल्याने चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्मयांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
येथील वॉर्ड क्र. 1 मधून भाग्यश्री कोकितकर, बबिता कोकितकर, यल्लाप्पा काकतकर, वॉर्ड क्र. 2 मधून रामचंद्र मन्नोळकर, आरती कडोलकर, सुमन राजगोळकर, रामचंद्र कुदेमानीकर, वॉर्ड क्र. 3 मधून एन. एस. पाटील, संगीता पलंगे, वॉर्ड क्र. 4 नागेश मन्नोळकर, चंद्रकांत बांदिवडेकर व चेतना अगसगेकर, वॉर्ड क्र. 5 रेणू गावडे, मीनाक्षी हित्तलमनी, नितीनसिंग राजपूत, सीमा देवकर, वॉर्ड क्र. 6 विठ्ठल देसाई, ज्योती घाटगे, वॉर्ड क्र. 7 निर्मल धाडवे, वॉर्ड क्र. 8 मिथुन उसुलकर, ओमकार हळदणकर, लता उसुलकर, वॉर्ड. क्र. 9 उमाशंकर सोनवडेकर, राहुल उरणकर, वॉर्ड क्र. 10 ज्ञानेश्वर ऊर्फ डी. बी. पाटील, लक्ष्मी परमेकर, कांचन साठे, वॉर्ड क्र. 11 रेणुका भातकांडे, प्रवीण पाटील, प्रेरणा मिरजकर, वॉर्ड क्र. 12 गजानन बांदेकर, अलका कित्तूर, वॉर्ड क्र. 13 परशराम कुडचीकर व वॉर्ड क्र. 14 मधून अशोक कांबळे हे उमेदवार विजयी झाले.
रामचंद्र मन्नोळकरांचा चौकार!
हिंडलगा पंचायतीच्या वॉर्ड क्र. 2 मध्ये सर्वाधिक चुरस निर्माण झाली होती. मात्र वॉर्डमधून सलग तीन वेळा निवडून आलेले माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर रिंगणात होते तर प्रतिस्पर्धी म्हणून ग्रामविकास आघाडीचे उमेदवार विनायक पावशे होते. मन्नोळकर यांना विजयापासून रोखण्यासाठी विरोधकांनी अत्यंत खटाटोप करून व्युहरचना रचली होती. पण अनुभव आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे मन्नोळकर यांनी निवडणूक चिन्ह असलेल्या क्रिकेट बॅटने चौकार मारत विजय संपादन करत सलग चौथ्यांदा ग्राम पंचायतीत सदस्यपदी प्रवेश मिळविला आहे. तसेच त्यांचे लहान बंधू नागेश मन्नोळकर हे देखील वॉर्ड क्र. 4 मधून सलग दुसऱयांदा विजयी झाल्याने ग्रामविकास लोकशाही आघाडीच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.