वर्ष सरत आले आहे. बघता बघता नवे वर्ष येईल. वैयक्तिक पातळीवर आणि सामूहिक पातळीवर प्रत्येकालाच हे वर्ष इतर वर्षांपेक्षा निराळे गेले असेल. असे वर्ष कधी येईल हे कुठल्या पंचांगात, कोणाच्या कुंडलीत किंवा अगदी नॉस्ट्राडय़ाम्सच्या भविष्यवाणीत देखील लिहिलेले असेल की नाही, कुणास ठाऊक.
वैयक्तिक पातळीवर मला वर्षभर एकेक अनुभव येत गेले. एका बालमित्राने निवृत्तीनंतर वृत्तपत्रांचे लहानसे दुकान थाटले होते. लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधल्या रात्री त्याने मला बजावले होते की ‘उद्या सगळी कामे लवकर उरकायची. दिवसभर घरात बसायचे. उद्या सरकार अवकाशातून देशभर औषध फवारणी करील आणि कोरोनाचे सगळे विषाणू मरतील.’ बागेत फिरायला गेल्यावर आम्ही एका उपाहारगृहात न्याहारीला जात असू. तिथले सत्याहत्तर वर्षांचे मॅनेजर मोदी अंकल वय विसरून आमच्याशी थट्टामस्करी करीत. बकरे काका नावाचे एक ज्ये÷ वकील आमच्या शेजारी रहात. आमच्या घराच्या परिसरात गोरगरिबांना माफक दरात उपचार देणारे अंबिके डॉक्टर कोरोनाच्या काळातही रुग्णसेवा अहर्निश करीत होते. कोरोनाने कोणाला सोडले नाही. रिगल मित्र समूह नावाचा आम्हा समानशीलांचा एक समूह आहे. आम्ही नियमित भेटत वगैरे असू. त्या समूहातला आमचा खटय़ाळ मित्र श्रीरंग कोरोनाने ओढून नेला. आम्ही कोणी त्याला साधे भेटू देखील शकलो नाही.
या सगळय़ा काळय़ाकुट्ट वातावरणात चांगले काहीच नव्हते का? भीतीपोटी-किंवा अंगभूत स्नेहापोटी-माणसे एकमेकांना घट्ट धरून राहिली. पोकळ का असेना, धीर देत राहिली. मिरजेचे डॉक्टर अशोक माळी या काळात लोकांना सक्रिय दिलासा देत होते. व्हॉट्सअप ग्रुप हे मला न मानवणारे प्रकरण. पण आमच्या बालमित्रांच्या ‘बेस्ट’ ग्रुपमधले मित्र एकमेकांशी संपर्कात राहिले. ऐन लॉकडाऊनच्या काळात जेव्हा ज्ये÷ नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते तेव्हा एका थोर बँकेने केवायसीसाठी पेन्शन अडवण्याचा अनुभव दिला आणि नंदकुमार जाधव नावाचा फेबुमित्र मदतीला धावून आला.
सहाहून अधिक महिने घरात कोंडलेलो असताना कृपाल देशपांडे, परेश जोशी आणि कुणाल हजेरी या तीन तरुण मित्रांनी मला इतिहासावरील काही ग्रंथ वाचायला उपलब्ध करून दिले. लॉकडाऊनच्याच काळात मी त्यातल्या आवडलेल्या ग्रंथांचे मराठी अनुवाद केले.
या वर्षाची श्रीशिल्लक कशी मोजावी हे अजून उमजलेले नाही.








