महामार्गावरील हातिवले येथे गुरे वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
वार्ताहर / राजापूर
अवैध गुरांच्या वाहतुकी विरोधात राजापूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी हातिवले येथे अशापकारे गुरे वाहतूक करणारा टेम्पो पकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये चार बैल व पाच लाखाची गाडी जप्त करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत झालेली ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे अवैध गुरे वाहतूक करणाऱ्यांचे चागलेच धाबे दणाणले आहेत.
राजापूर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरून कणकवलीच्या दिशेने गुरांची वाहतूक होत असल्याची माहीती मिळाल्यानंतर गस्तीवर असलेल्या राजापूर पोलिसांनी सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हातिवले येथे सदर टेम्पो (एम.एच. 07 एजे 0894) थांबवून तपासणी केली असता गाडीत चार बैल असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी गाडी चालक गणेश शांताराम गजबाल (राह.फोंडा तिठा, सिंधुदुर्ग) व रमेश शांताराम गजबाल (राह.देवरूख बागवाडी) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्यावर प्राणी छळ अधिनियम 1960 11, (1) (घ)(ध)(च) पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119, मोटार वाहन कायदा कलम 1988, 66/192 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींकडून सुमारे 68 हजाराचे चार बैल आणि पाच लाखाचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर कोरे यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष वालावलकर करीत आहेत.
राजापूर तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात विनापरवाना जनावरांची वाहतूक केली जात आहे. अशा अवैध गुरांच्या वाहतूकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात गेल्या 15 दिवसांमध्ये ही तीसरी कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी पाचल व नाटे येथे गुरांची वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे तालुकावासीयांकडून स्वागत होत आहे.









