प्रतिनिधी / इस्लामपूर
विधानसभेला इस्लामपूरच्या जनतेन नगराध्यक्षांना स्विकारले नाही. ना.जयंत पाटील यांनाच स्विकारले आहे. याचा राग त्यांना आहे. त्यातून उठसूठ ते ना.पाटील यांच्यावर टीका करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. ११४ कोटीचा निधी आणल्याचा ते गाजावाजा करीत आहेत. निधी आणला आहे, तर तो गेला कुठे ?. यांनी अतिशय अपरिपक्वपणाचे वक्तव्य केले आहे. तुम्ही जनतेला ड्रामा करून सांगू नका, त्यांना वेळ द्या, असा टोला राष्ट्रवादीचे शहर प्रमुख व नगरसेवक शहाजी पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक आनंदराव मलगुंडे, संग्राम पाटील, विश्वनाथ डांगे, कमल पाटील यांची उपस्थिती होती. पाटील पुढे म्हणाले, ११४ कोटी निधी आला असता तर इस्लामपुरात काचेचे रस्ते झाले असते. नगराध्यक्षांनी फक्त १२ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. यामध्ये विशेष अनुदान १० कोटी व वैशिष्टये पूर्ण अनुदानातून २ कोटी रुपये असा एकूण १२ कोटीचा निधी आणला आहे. मात्र पक्षप्रतोद विक्रम पाटील हा निधी मी आणल्याचे सांगत आहेत. निधी कुणी आणला हे आधी ठरवा.
पाटील पुढे म्हणाले, चार वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जनतेसाठी किती वेळ दिला. ना.पाटील यांच्यावर टीका करणे एवढाच उद्योग केला आहे.
जयंत पाटील यांनी आमदार फंडातून इस्लामपूरसाठी साडे पाच कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे. व विकासकामांसाठी ३० जूनला ५ कोटी रुपये दिले आहेत. प्रत्येक वेळेला जयंत पाटील यांना कासेगावचे म्हणून बोलता, ज्यावेळेला तुम्ही त्यांचे नेतृत्व स्वीकारले त्यावेळेला ते कासेगावचेच होते.








