शहापूर पोलीस १०० कमिटी या नावाने व्हॉटसअप ग्रुप कार्यरत
प्रतिनिधी / इचलकरंजी
नेहमीच खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या दाखल होण्यार्या गंभीर गुन्ह्यांबरोबर या परिसरात नामचिन गुंडाच्या एकापेक्षा अधिक गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असल्याने शहापूर पोलीस ठाण्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची करडी नजर लागून राहिली आहे. अशा या पोलीस ठाण्याच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर अश्लिल चित्रफित प्रसारित झाली. त्यामुळे हे पोलीस ठाणे दोन दिवसांपासून चर्चेत आले आहे. या व्हॉटस्अॅप ग्रुपवर पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. इतका गंभीर प्रकार घडूनही अश्लिल चित्रफित प्रसारीत करणाऱ्या संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
या पोलीस ठाण्याचा ‘शहापूर पोलीस १०० कमिटी’ या नावाने एका बड्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन व्हॉटस्अॅप ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. हा ग्रुप चार वर्षांपासून कार्यरत असून या ग्रुपचा अॅडमिनही पोलीस कर्मचारी असून त्यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि दक्षता कमिटीमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या ग्रुपवर रविवारी (२७ डिसेंबर) सायंकाळी एका व्यक्तीने तब्बल सात अश्लिल चित्रफिती प्रसारीत केल्या. या चित्रफिती पाहता त्या जिल्ह्यातच बनविल्या असण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केल्या. अश्लिल चित्रफित प्रसारीतमुळे या ग्रुपमध्ये एकच खळबळ उडाली. ग्रुपवर प्रसारित झालेल्या अश्लिल चित्रफितीचा प्रकार ग्रुपमधील काही सदस्यांनी ग्रुप अॅडमिन असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ग्रुप अॅडमिननी त्वरीत ग्रुपमधील सर्वांना ‘रिमूव्ह’ करण्यात आले. पण अश्लिल चित्रफित प्रसारीत करणाऱ्याविरोधांत अद्यापी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे इचलकरंजी परिसरात या प्रकाराची वेगळी चर्चा केली जात आहे.