उपमुख्यमंत्री कवळेकर यांचे उद्गार
प्रतिनिधी/ मडगाव
कोरोनाच्या महामारी दरम्यान, ज्या-ज्या लोकांनी आपल्या जीवाची परवा न करता राज्याच्या हितासाठी कार्य केले अशा लोकांची आपण आठवण करणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारी कर्मचाऱयांना त्यांच्या कार्याचे वेतन हे सरकारकडून मिळतच असते. पण असे असून सुद्धा आपल्या परिवारापासून दूर राहून काम करणे हे एक कौतुकास्पद कार्य असते. पोलीस, आरोग्य, कदंब कर्मचारी, अग्नीशामक दलाचे जवान व स्वयंसेवक या सर्व कोरोना योद्धांमुळे आज राज्याची परिस्थीती सुधारत चाललेली आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा राज्यातील बहुतेक हॉटेल फूल झालेल्या आहेत असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.
मडगाव रवींद्र भवनमध्ये आयोजीत केलेल्या दामबाबाले घोडे सांस्कृतिक मंडळातर्फे कोरोना योद्धाच्या सत्कार सोहळय़ानिमित्त प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, अभिनेते मकरंद अनासपुरे, अरविंद जगताप, मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक, दौलत हवालदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुद्धा अशा महामारीच्या काळात धाडसी निर्णय घेऊन काम केलेले आहे. अमेरीका सारख्या देशाला यावर नियंत्रण आणण्यास अपयश आलेले आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी कोरोनाच्या काळात व्हिडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत होते. भाजपने कोरोनाच्या काळात लोकांसाठी गरजू वस्तु पुरविण्याचे काम केले होते. भाजपने सदैव जनतेच्या हितासाठी काम केलेले आहे. भाजपचे कार्य बघूनच जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असे उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले.
लॉकडाऊनमुळे खुपच शिकायला मिळाले
अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले की, लॉकडाऊनमुळे आपल्याला खुपच शिकायला मिळाले. महामारीच्या काळात आम्हाला आपली माणसे कोण याची ओळख करण्याची संधी लाभली. यापुर्वी कुणीही स्वतासाठी वेळ दिलेला नव्हता. आपल्याकडे कशाची कमतरता आहे याची जाणीव करण्याची संधी मिळाली. खासगी डॉक्टरांनी तर आपली चिकित्सालये बंद करुन ठेवली. त्यामुळे ज्या कोरोना योद्धांनी या महामारीत स्वताचा जीव धोक्यात घालून काम केलेले आहे अशा सर्व योद्धांचे आपण आभार मानले पाहिजे. माणसाचे विचार माणसाला बदलू शकतात तसे ते बिघडूही शकतात. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गोंधळ या व्हिडियोचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्या व्हिडियोची प्रशंसा अनासपुरे यांनी यावेळी केली.
नको असलेल्या ठिकाणी राजकारण ही केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना योद्धांच्या कार्याची प्रशंसा करण्याचे काम केले. या योद्धांना समाजातील लोकांनी आदराने पहावे यासाठी त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे आज अनेक संस्थेतर्फे कोरोना योद्धांचा विविध ठिकाणी सत्कार करत असताना आम्हाला बघायला मिळतो. पोलिसांनी लोकांना कोरोना पासून वाचविण्याकरिता आपल्या दांडय़ाचा उपयोग केला. काहींनी नको असलेल्या ठिकाणी राजकारण करण्याचे प्रयत्न केले.
दहावी व बारावीच्या परीक्षा होऊ नये यासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. पण, मुख्यमंत्र्यांनी अशा परिस्थीतही दहावी व बरावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या नव्हता. विद्यार्थांनी आपल्या परिश्रमाने चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होण्याचे काम केले. यासाठी पालकांनी केलेल्या सहकार्याचेही अभिनंदन केले पाहिजे असे सदानंद तानावडे म्हणाले.
लोकांनी निवडणुकीत सहकार्य करण्याची गरज
सामान्य माणसांचे विचार नेहमीच चांगले असतात. पण त्यांच्याकडे जास्त पैसे नसल्याने त्याचा उपयोग योग्य पद्धतीने होत नाही. दामबाबाले घोडे या सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन ते विचार इतरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. यापुढेही अशाच पद्धतीचे कार्य सुरुच ठेवले जाईल. पण, याहुन अधिक दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन व्हावे याकरिता लोकांनी येणाऱया निवडणुकीत सहकार्य करण्याची गरज असल्याचे मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक म्हणाले.
पोलीस, आरोग्य व कदंब कर्मचारी, अग्नीशामक दलाचे जवान व स्वयंसेवक हे सर्व कोरोना योद्धे व दहावी व बारावी परीक्षेत उत्तम कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी दामबाबाले घोडे या सांस्कृतिक संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.









