जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिपादन : कोरोनाच्या नव्या स्वरुपाला घाबरू नका : तज्ञांचा सल्ला
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या संकरावताराप्रकरणी (स्ट्रेन) घाबरविण्याची अजिबात गरज नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांचे म्हणणे आहे. भारतासह जगभरात तयार होणाऱया लसी विषाणूच्या नव्या स्वरुपावरही प्रभावी ठरतील. 9 ते 10 महिन्यांमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूत दिसून आलेला बदल हा किरकोळ स्वरुपाचा आहे. विषाणूत आगामी संभाव्य बदल पाहूनच लस तयार केली जात असल्याचे स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले आहे.
जगभरात लसींची निर्मिती विविध घटकांद्वारे होत आहे. भारतात निर्माण होणाऱया लसी प्रोटीनवर आधारित आहेत. विषाणूचे स्वरुप प्रचंड बदलल्यावरही भीतीचे कारण नाही. कारण प्रोटीन आधारित लसीला 4 ते 6 आठवडय़ात अद्ययावत करता येते. परंतु याची गरज बहुधा भासणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
भारतात किती प्रकारचे स्ट्रेन

भारतात जीनोम सीक्वेंसिंग अधिक प्रमाणात झालेले नाही. आतापर्यंतच्या सीक्वेंसिंगद्वारे भारतात प्रारंभिक काळात सर्वात पहिले विषाणूचे स्वरुप चीनच्या वुहान शहरातील होते हे समजले आहे. त्यानंतर इटली आणि अन्य युरोपीय देशांमधील विषाणूचे संकरावतार भारतात पोहोचले. आफ्रिका-अमेरिकेतील संकरावतारही देशाच्या विविध राज्यांमध्ये आढळले आहेत. परंतु मूळ वर्तनात अत्यंत अधिक बदल झाल्याचे अद्याप कुठल्याच नव्या स्वरुपात दिसून आले नसल्याचे आयसीएमआरचे माजी प्रमुख रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले आहे. नव्या संकरावताराचा भारतावर कुठलाच विशेष प्रभाव पडणार नाही. देशात विषाणूचे कित्येक संकरावतार पूर्वीपासूनच आहेत. नव्या स्वरुपावर युरोपमध्ये अध्ययन झाले असून तो केवळ वेगाने फैलावतो, त्यातून मृत्यू अधिक होत नसल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमध्ये नवे स्वरुप आढळून आल्यावर प्रतिदिन सापडणाऱया रुग्णांची संख्या 14 हजारांवरून वाढून 29 हजार झाली, तर प्रतिदिन बळींची संख्या 400 वरून 500 झाली आहे. म्हणजेच रुग्ण 100 टक्क्यांनी वाढले तर बळींचा आकडा 25 टक्क्यांनी वाढला आहे.
संभाव्य बदलांनुसारच लसनिर्मिती
विषाणूत होणारे उत्परिवर्तन विचारात घेऊनच भारत बायोटेक आणि अन्य कंपन्यांनी लस तयार केली आहे. लसींमध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन आहेत. एखादा प्रोटीन नव्या स्वरुपावर निष्प्रभ ठरला तरीही अन्य स्वतःचे काम करत राहणार आहेत. जगात काही लसी प्रोटीन, काही न्यूक्लिक ऍसिड तर काही स्पाइक प्रोटीनने तयार केल्या आहेत.
सर्व लसी प्रभावी ठरणार
बहुतांश विषाणू उत्परिवर्तनानंतर कमकुवत होत जातात. कालौघात हा विषाणूही निष्प्रभ ठरण्याची शक्यता आहे. विषाणूत नेहमीच उत्परिवर्तन होत असते. परंतु त्याचे मूळ वर्तन बदलत नाही. याचमुळे आतापर्यंत विकसित झालेल्या सर्व लसी त्यावर प्रभावी ठरतील अशी माहिती भारत बायोटेक कंपनीकडून विकसित लसीच्या वैद्यकीय परीक्षणाची जबाबदारी सांभाळणारे कम्युनिटी मेडिसीनचे डॉ. संजय रॉय यांनी दिली आहे.
भीतीपेक्षा दक्षता हवी

सर्व देश स्वतःच्या नागरिकांना अधिक सतर्क राहण्यास सांगत आहेत, जे योग्य आहे, कारण विषाणूचे नवे स्वरुप अत्यंत वेगाने फैलावत आहे. हा विषाणू संक्रमित करत असल्याने घबराट दिसून येत आहे. विषाणूचे नवे स्वरुप मूळ विषाणूपेक्षा अधिक वेगळे नाही. नव्या स्वरुपालाही लसीद्वारे नष्ट केले जाऊ शकते हे समजून घेण्याची गरज असल्याचे वॉयरोलॉजिस्ट प्राध्यापक शाहीद जमील यांनी म्हटले आहे. विषाणूचे उत्परिवर्तन होतच असते.









