प्रतिनिधी / बेळगाव
ज्येष्ठ पत्रकार आणि परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते संजय कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या सिंधुदुर्ग- शिरोडा येथील परिवारातर्फे देण्यात येणारा 2020-21चा कबीर साहित्य पुरस्कार बेळगाव येथील मराठी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका, कवयित्री, संशोधक, भाषांतरकार प्रा डॉ शोभा नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्कार कोरोनानंतर बेळगाव येथे मराठीतील मान्यवर साहित्यिकाच्या हस्ते डॉ. नाईक यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
कबीर पुरस्कार दरवर्षी मराठीतील एका आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या लेखक-कवीला किंवा सामाजिक कार्यकर्त्याला दिला जातो. गेल्या वर्षीचा कबीर पुरस्कार आजरा येथील धरणग्रस्त चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक संपत देसाई यांना देण्यात आला होता. पुरस्कार विजेत्याला त्याच्या घरी किंवा त्याच्या गावी कबीर पुरस्कार प्रदान करून समारंभपूर्वक गौरविले जाते.
प्रा.डॉ. शोभा नाईक या सध्या बेळगाव आरपीडी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून कविता, समीक्षा संशोधन आणि भाषांतरकार आदी प्रकारात त्या लेखन करतात.त्यांचे आजवर विविध लेखन प्रकारातील अनेक ग्रंथ प्रकाशित असून त्यांना कर्नाटक विद्यापीठाच्या कविवर्य विंदा करंदीकर साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्काराने तीन वेळा गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये समीक्षा आणि सौंदर्यशास्त्रासाठी असणाऱ्या श्री.के. क्षीरसागर या पुरस्काराचा समावेश आहे. तर कर्नाटक शासनाच्या अकरावी बारावी मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्या कार्यरत होत्या.
प्रा. डॉ शोभा नाईक- प्रकाशित ग्रंथ
1. या जगण्यातून- कवितासंग्रह,2002
2.जीबन नरह यांची आसामी कविता (अनुवाद) ,2005
3. भारतीय संदर्भातून स्त्रीवाद,स्त्रीवादी समीक्षा आणि उपयोजन,2008
4.लोकसंचितातील स्रीचित्तवेध, 2009
5. बहिणाबाई चौधरी यांची कविता (समीक्षा), 2009
6. देखणी:जगण्याचे ऊर्ध्वपातन ,(समीक्षा), 2011
7.बेगम बर्वे:एक दृष्टिक्षेप,(समीक्षा), 2011
8.कन्नड संतकवी कनकदास(अनुवाद सहकार्याने), 2011कर्नाटक शासन
9 .व्यर्थ न हो बलिदान(कन्नड कादंबरी अनुवाद), 2012 कर्नाटक शासन
10. दुर्गा भागवत,(साहित्य अकादमी) 2013
11. मराठी कन्नड सांस्कृतिक 11 सहसंबंध(संशोधन समीक्षा),2014
12.चारूवसंता(कन्नड खंडकाव्य,अनुवाद) 2014
13. यशोधरा झोपली नव्हती (कन्नड नाटकाचा अनुवाद) 2015
14. मागे वळून पाहताना, 2015
15.बहुभाषा भारती तू एकतेची आरती,(कुवेंपु यांच्या लेखांचा अनुवाद) 2016 कर्नाटक शासन
16.वाड.मयीन इतिहासाचे पुनर्लेखन(संपादन,सहकार्याने)-आगामी,साहित्य अकादमी
17 हिंदू:जगण्याच्या गुंतावळीचा शोध-समीक्षा- आगामी
18.कन्नड संस्कृती समीक्षा (अनुवाद,साहित्य अकादमी करिता)
19 मराठी व कन्नड स्त्रियांची कादंबरी- तौलनिक अभ्यास-आगामी
20.इरावती कर्वे (आगामी) साहित्य अकादमी









