गोडोली / प्रतिनिधी
आजही राज्यात अनेक भागात बालविवाह होत असून ते रोखण्यासाठी समाजमनाला शहाणे करण्याची गरज आहे. यासाठी सामाजिक वास्तव समोर आणणारा “पंख फुटलेले मुलगी ” हा चित्रपट चळवळीतील विचारांचे माध्यम म्हणून महाराष्ट्रभर पोहोचेल,”असे मत पत्रकार हरिष पाटणे यांनी “लेक लाडकी अभियानाची निर्मिती असलेल्या “पंख फुटलेले मुलगी ” या चित्रपटाचा प्रिमियर शोच्या वेळी व्यक्त केले.
दि.२५ डिसेंबर हा मनुस्मृती दहण दिनाचे औचित्य साधून ” पंख फुटलेले मुलगी” हा चित्रपट साताऱ्यातील चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती आणि चळवळीतील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शित झाला.
यावेळी अॅड.मनिषा बर्गे यांनी “बालगृहात अशा पद्धतीने बालविवाह थांबवण्यासाठी रोजच प्रयत्न करावा लागतो. समाजातील सर्वच घटकांनी या विषयाबाबत संवेदनशील राहून सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे,” असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खंडाईत यांनी ,” येशूच्या जन्मदिनी बाबासाहेब आंबेडकर यानी रायगडावर मनुस्मृतीचे दहण केले. बुद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी कृतिशील राहून चळवळ सक्रिय करण्याचा निर्धार करावा,”असे सांगितले.
चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, संकलक आणि चळवळीतील कार्यकर्ते श्री कैलास जाधव, चित्रपटातील कलाकार सोनाली बडे, दीपेंती चिकणे, श्रीधर इंगळे , शशी गाडे , कॅमेरामन केतन मोहिते, गायिका प्राजक्ता महामुनी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अॅड.वर्षा वर्षा देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन अॅड. शैला जाधव यांनी केले. राज्यघटनेचे वाचन अॅड.वनराज पवार यांनी केले. उमा कांबळे यांनी आभार व्यक्त केले.