दाटे येथील ऋषीकेश सातर्डेकर यांचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी / चंदगड
लग्न म्हटले की थाटमाट आणि पर्यायाने मोठा खर्च. विवाह सोहळा कसा स्मरणात राहिल याचा प्रयत्न करण्यात वधू -वराकडील मंडळी लाखो रूपयांचा खर्च करतात. विशेषतः आज एकविसाव्या शतकात सुद्धा लग्नसोहळ्यात पारंपारिक रीतीरिवाजांना खूप महत्व दिले जाते. या सर्व खर्चाला फाटा देऊन दाटे येथील ऋषीकेश, शुभांगी यांनी स्वतःचे लग्न साध्या पद्धतीने श्रीपादवाडी येथील मंदिरात लावून लग्नाच्या खर्चाचे पैसे पाटणे येथील तीन अनाथ मुलींना पाच हजार रुपयाची त्यांच्या शिक्षणाकामी आर्थिक मदत केली. पाटणे येथील महादेव बागवे यांच्या तीन मुली आई वडीलांवीना पोरक्या झाल्या. मयुरी, ममता व सुवर्णा या तीनही मुली सध्या दाटे येथे आपल्या मावशीकडे व मामाकडे राहतात.
डिसेंबर २०११ मध्ये आई मनिषा हिचा मेंदूच्या आजाराने अचानक अंत झाला. वडील महादेव यांनी मुलींचा कसाबसा सांभाळ करत होते. २०१७ रोजी महादेव बागवे आपल्या मुलींना सोडून देवाघरी गेले. आणि सुरु झाला या मुलींच्या आयुष्याचा ‘चिमण्या पाखरांचा ‘ प्रवास. चिमुकल्या सुवर्णाला इंजिनीयर व्हायचं आहे. तर ममताला डॉक्टर व्हायचं आहे. त्यांच्या या स्वप्नानां बळ देण्यासाठी ऋषीकेश सातर्डेकर यांनी त्यांना मदत देऊ केली. सातर्डेकर यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.