कारवार जिल्हाधिकाऱयांची माहिती : जोयडा, दांडेली, हल्याळ, यल्लापूर, मुंदगोड, शिरसीसह सिद्धापूर तालुक्यात उद्या मतदान
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील ग्राम पंचायतीच्या दुसऱया टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती कारवार जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार के. यांनी दिली. जिल्हय़ातील किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर व भटकळ या पाच तालुक्यातील 101 ग्राम पंचायतीची निवडणूक दि. 22 रोजी शांत वातावरणात पार पडली. दुसऱया टप्प्यात जिल्हय़ातील घाटमाथ्यावरील जोयडा, दांडेली, हल्याळ, यल्लापूर, मुंदगोड, शिरसी आणि सिद्धापूर या पाच तालुक्यात रविवार दि. 27 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱया टप्प्यातही निवडणूक शांत वातावरणात पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्हाधिकारी म्हणाले, रविवार दि. 27 रोजी जिल्हय़ातील 126 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 3 हजार 452 उमेदवार उतरले आहेत. यामध्ये जोयडा तालुक्यातील 421, दांडेली 111, हल्याळ 500 यल्लापूर 416 मुंदगोड 527, शिरसी 857 आणि सिद्धापूर तालुक्यातील 620 उमेदवारांचा समावेश आहे.
मतदारांची संख्या 3 लाख 98 हजार 782
27 डिसेंबर रोजी 7 तालुक्यातील 3 लाख 98 हजार 782 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 3 हजार 684, महिला मतदारांची संख्या 1 लाख 95 हजार आणि इतर मतदारांची संख्या 4 इतकी आहे. जोयडा तालुक्यातील 40 हजार 163, दांडेली 10 हजार 47, हल्याळ 65,275, यल्लापूर 50,503, मुंदगोड 58,076, शिरसी 102892 आणि सिद्धापूर तालुक्यातील 71 हजार 826 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
3 हजार 763 कर्मचाऱयांची नेमणूक
निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी एकूण 7 हजार 763 कर्मचाऱयांची नेमणूक केली आहे. यामध्ये 765 पी.आर.ओ. 767 एपीआरओ 1543 पीओ आणि 644 डी श्रेणीच्या कर्मचाऱयांचा समावेश आहे. निवडणूक कर्मचाऱयांच्या आणि साहित्याच्या वाहतुकीसाठी 71 बसेस 81 जीप्स, 61 टेंपो आणि सहा मिनीबसची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोविड-19 एसओपी साठी 802 आरोग्य कर्मचाऱयांची आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी 792 पोलीस कर्मचाऱयांची नेमणूक केली आहे.
मस्टरिंग आणि डिमस्टरिंगची व्यवस्था जोयडा येथील सरकारी तंत्रनिकेतनमध्ये करण्यात आली आहे. दांडेली तालुक्यातील ही व्यवस्था येथील जनता पदवीपूर्व महाविद्यालयात तर हल्याळ तालुक्यातील ही व्यवस्था हवगी-हल्याळ येथील सरकारी पदवी महाविद्यालयात करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे मुंदगोड येथील व्यवस्था सरकारी पदवी महाविद्यालयात करण्यात आली आहे. यल्लापूर येथील विश्वदर्शन शैक्षणिक संस्थेत, शिरसी येथील सरकारी मारिकांबा माध्यामिक शाळेत आणि सिद्धापूर येथील सरकारी हायस्कूल हळदकट्टा येथ करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांची संख्या 664
सात तालुक्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या 664 इतकी आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 109 इतकी तर अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 67, दांडेली 17, हल्याळ 104, यल्लापूर 97, मुंदगोड 91, शिरसी 163 आणि सिद्धापूर तालुक्यातील मतदान केंद्रांची संख्या 125 इतकी आहे.









