मतदारांना मटण-दारुसह पैशाचे अमिष : निवडणूक अधिकाऱयांचे दुर्लक्ष
वार्ताहर / निपाणी
ग्रामपंचायतीसाठी 27 रोजी मतदान होणार आहे. यामुळे येणाऱया दोन दिवसानंतर प्रचाराची सांगता होणार आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना घेऊन मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध अमिषे दाखविली जात असून पैशाचा अक्षरशः चुराडा सुरू झाला आहे.
महापूर व कोरोना संसर्ग काळात मोठय़ा प्रमाणात आर्थिक हानी झाली. विशेषतः ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला. सामान्य, कष्टकऱयांसह गर्भश्रीमंतही यामध्ये होरपळून गेले. असे बोलले जात होते. पण सध्या लागलेल्या ग्रा. पं. निवडणुका आणि सत्तेसाठी सुरू झालेले इर्षेचे राजकारण पाहता चिंता व्यक्त होत आहे. मतासाठी सुरू झालेल्या राजकारणातून पैशाची उधळपट्टी सुरू असून निवडणूक अधिकारी मात्र कोठेही कारवाई करताना दिसत नाहीत.
लोकशाही राज्य व्यवस्थेने पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्येकाला आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला आहे. प्रत्येकाच्या मताचे मूल्य समान ठेवले आहे. यामुळे घटनेने दिलेल्या या अधिकाराचे मूल्य न करता पावित्र्य जपणे ही मतदाराची जबाबदारी आहे. पण सद्यस्थिती पाहता बहुतांशी मतदारांना याचा विसर पडल्याचे दिसत आहे.
ग्रा. पं. ची सत्ता म्हणजे राजकारणाचा पाया असे संबोधले जाते. या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नसल्याने पक्ष चिन्हाचा कोठेच वापर होत नाही. पण पुरस्कृत या गोंडस नावाखाली अनेक उमेदवार याला पक्षीय राजकारणाची झालर लावतात. वैयक्तिक पक्षीय, भाऊबंदकी वादातून लढविली जाणारी ग्रा. पं. निवडणूक जिंकण्याच्या इर्षेतून टोकाला पोहोचली आहे. जिंकण्यासाठी आपली ध्येय धोरणे सांगताना केल्या जाणाऱया प्रचाराला शेवटच्या टप्प्यात दुय्यम स्थान दिले जात असून फक्त अमिषे दाखवून मतदार राजाला आपलसं करण्याचा प्रयत्न होत आहे.
प्रत्येक मत ही विजयाची नांदी समजून कामानिमित्त बाहेरगावी असणाऱया मतदारांना निरोप देऊन बोलावून घेतले जात आहे. त्याच्या कामाची होणारी खोटी व प्रवास याची तरतूदही केली जात आहे. याबरोबरच अनेक ठिकाणी जेवनावळींचे आयोजन होत आहे. हॉटेल-धाबे-बार देखील फुल्ल होत आहेत. मटण, चिकन, दारूचे अमिष दाखविले जात आहे. घराघरात चिकन, श्रीखंड, वाटपही केले जात आहे. बऱयाच उमेदवारांकडून तर मताचे मुल्य करुन पैशांचे वाटप होत आहे. यामुळे ग्रामीण भागात इर्षेच्या राजकारणाने सर्वोच्च बिंदू गाठल्याचे स्पष्ट होत आहे.









