ब्रिटनमध्ये एक आठवडय़ात कोरोना विषाणूचे दुसरे स्वरुप आढळले : संबंधित दोन्ही बाधित दक्षिण आफ्रिकेतून परतलेले
ब्रिटनमध्ये एक आठवडय़ात कोविड-19 च्या दुसऱया आणि नवीन संकरावताराचा शोध लागला आहे. आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी याला अत्यंत चिंताजनक बाब संबोधिले आहे. दोन रुग्ण सापडले असून दोघेही काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. काही आठवडय़ांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या लोकांनी विलगीकृत व्हावे आणि आरोग्य प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन मॅट यांनी केले आहे.
कोरोनाच्या नव्या जेनेटिक म्यूटेशनचा (सर्वसामान्य भाषेत विषाणूचे नवे स्वरुप) शोध लागला असून याचमुळे बाधितांची संख्या वाढत असल्याची शक्यता असावी, असे दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाने मागील आठवडय़ात म्हटले होते.
अधिक वेगाने फैलाव
ब्रिटनने सर्वप्रथम लसीकरणाला मंजुरी दिली असली तरीही तेथे आता रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. नवा संकरावतार 70 टक्के अधिक वेगाने फैलावतो. कोविड-19चे नवे स्वरुप अत्यंत चिंताजनक बाब असून तो अधिक संक्रामक आहे. याचमुळे दक्षिण आफ्रिकेतून अलिकडेच परतलेल्या लोकांना विलगीकरणाचे आवाहन करतो. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनीही हेच पाऊल उचलावे, असे मॅट यांनी म्हटले आहे. ब्रिटनने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱया विमानोड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे.
तज्ञांचे मत वेगळेच
दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये आढळून आलेला संकरावतार एकसारखाच आहे किंवा दोघांमध्ये फरक आहे याची ठोस माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. तर ब्रिटनमधील विषाणूचे नवे स्वरुप आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेला विषाणू अत्यंत वेगळे आहेत. त्यांचे उत्परिवर्तनही वेगळे आहे. दोघेही वेगाने फैलावतात हीच एक गोष्ट त्यांच्यात समान आहे. यासंबंधी संशोधन करत आहोत. असे उद्गार पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या सुसान हॉपकिन्स यांनी काढले आहेत.
लस प्रभावीच राहणार
नवा संकरावतार आणि सद्यस्थितीसंबंधी सुसान यांना फारशी चिंता वाटत नाही. दक्षिण आफ्रिकेतील नव्या संकरावतारावर लवकरच नियंत्रण मिळविले जाईल असा विश्वास आहे. याचबरोबर उपलब्ध लसींद्वारेही यावर नियंत्रण मिळविता येणार आहे. लस नव्या स्वरुपावर प्रभावी ठरणार नाही याचे कुठलेच पुरावे नाहीत. विषाणूच्या अनेक प्रकारांवर ही लस पूर्णपणे आणि सुरक्षित पद्धतीने नियंत्रण मिळवू शकते, असे सुसान यांनी म्हटले आहे.









