तीन शाळांसाठी आलेला निधी अद्यापही खर्च नाही : तातडीने पावले उचलण्याचे आदेश
प्रतिनिधी / कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील तीन शाळांच्या वर्गखोल्यांसाठी 2017-18 व 18-19 मध्ये आलेला निधी अद्याप खर्च पडलेला नाही. वास्तविक या निधीतून मंजूर वर्गखोल्यांची कामे सुरू करण्यासाठी जि. प.च्या शिक्षण विभागाकडून अपेक्षित प्रयत्न वेळेत न झाल्याने सुमारे 65 लाखांहून अधिक निधी परत जाण्याची शक्यता आहे. याबाबत जि. प. प्रशासनाने गांभिर्याने घेताच शिक्षण विभागाने तालुका पातळय़ांवर निधी खर्च होण्याच्यादृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मार्चपूर्वी याबाबतची कार्यवाही होऊन निधी खर्च न झाल्यास व परत गेल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, 2017-18 व 18-19 मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. या मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी कणकवली तालुक्यातील कासार्डे, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त व दोडामार्गमधील एका शाळेसाठीचा निधी मंजूर होता. कासार्डेच्या वर्गखोल्यांसाठी सुमारे 15 लाख, कलंबिस्तसाठी सुमारे 14 लाख, तर दोडामार्गसाठी 36 लाख 50 हजार रुपयांच्या जवळपास निधी मंजूर झाला. ही कामे त्याचवर्षी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, दोन वर्षे उलटली, तरीही ही कामे सुरू होऊ शकलेली नाहीत.
या शाळांच्या वर्गखोल्यांची कामे सुरू होण्यास असलेल्या अडचणींच्या अनुषंगाने जि. प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने पुढाकार घेत तालुका पातळीवरील अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र, ते प्रयत्न योग्यवेळी करण्यात न आल्याने हा निधी मागे जाण्याची शक्यता आहे. शिवाय काही शाळांच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठीही निधी आलेला होता. यातीलही काही निधी अखर्चित असल्याचे समजते. निधी मागे जाण्याची शक्यता दिसताच जि. प. प्रशासनाने शिक्षण विभागाला सक्त ताकीद देताच आता ही कामे सुरू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यात आली आहेत. कणकवली तालुक्यातील संबंधित शाळेच्या जागेसाठी तातडीच्या मोजणीसाठी पैसेही भरण्यात आलेले आहेत. मात्र, मार्चपूर्वी ही कामे सुरू होऊन निधी खर्च न झाल्यास पैसे परत गेल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.









