तालुक्यात अर्ज स्वीकारण्यासाठी शाहु क्रीडा संकुलात सोय
सातारा / प्रतिनिधी :
सातारा तालुक्यात डिसेंबर 2020 पर्यंत मुदत संपलेल्या 133 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. परंतु शहराची हद्दवाढ झाल्याने तीन ग्रामपंचायतींची निवडणूक होणारच नाही. उरलेल्या 130 ग्रामपंचायतीपैकी पाटखळची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे 129 ग्रामपंचायतींमध्ये आज अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी कोडोली ग्रामपंचायतीसाठी एकच अर्ज दाखल झाला. दरम्यान, अर्ज स्वीकारण्यासाठी सातारा प्रांत मिनाज मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.
सातारा तालुक्यात 133 पैकी संभाजीनगर, विलासपूर आणि दरे बुद्रुक या तीन ग्रामपंचायती सातारा शहराच्या हद्दवाढीत आल्याने त्यांच्या निवडणूका होणार नाहीत. उरलेल्या 130 पैकी पाटखळ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्दच करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे उरलेल्या 129 ग्रामपंचयातींसाठी आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूकांची धावपळ सुरु होती. कोण कॅफेत तर कोण सेतू केंद्रातून आपले अर्ज सादर करत होते. काही उमेदवार हे अर्ज स्वीकृती केंद्रात जावून अर्ज कसा भरायचा याची माहिती घेत होते.
सातारचे प्रांत मिनाज मुल्ला यांच्या मार्गदर्शनानुसार सातारच्या तहसीलदार आशा होळकर, नायब तहसीलदार सय्यद यांच्यासह छत्रपती शाहु क्रीडा संकुलात 50 आरओ, त्यांना 65 मदतनीस ठेवण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्स ठेवून टेम्परेचर मोजूनच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे.