चिपळुण काविळतळी येथील घटना
चिपळूण
शहरातील काविळतळी येथे एका महिलेकडून कुंभार्ली गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी उद्योग-व्यावसायासाठी मदत म्हणून घेतलेले तब्बल 75 तोळे सोन्याचे दागिने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 17 रोजी एकास अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 तोळे सोने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी लुबना राहिल अत्तार (काविळतळी-चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रजिया कुंभार्लीकर, तरबेज पुंभार्लीकर, तन्वीर कुंभार्लीकर, अलीसाहब कुंभार्लीकर (सर्व-कुंभार्ली-चिपळूण) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काविळतळी येथील लुबना अत्तार यांना वरील चौघांनी तालुक्यातील कुंभार्ली येथे स्वत:च्या मालकीची जमीन असल्याचे सांगत त्यावर उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली. लुबना यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी या चौघांना आपल्याकडील 76 तोळे सोन्याचे दागिने दिले. दोन वर्ष होऊन देखील वरील चौघांनी अत्तार यांना दिलेले दागिने वारंवार मागणी करूनही परत केलेले नाहीत. यातून आपली फसवणूक झाल्याचे लुबना अत्तार याच्या लक्षात आले.
याप्रकरणी त्यांनी 26 सप्टेंबर 2020 रोजी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली. पोलीसांनी रजिया, तरबेज, तन्वीर व अलीसाहब कुंभार्लीकर या चौघावर गुन्हा दाखल केला. पोलीसांकडून तपास सुरु असतानाच 17 डिसेंबर याप्रकरणी अलीसाहेब यास अटक करुन त्याच्याकडून 75 तोळेपैकी 10 तोळे सेने ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत झगडे करत आहेत. दरम्यान, उर्वरित रजिया, तरबेज तर तन्वीर या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.









