मार्च महिन्यात परीक्षा होणार नसल्याचे शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षांना अत्यंत महत्त्व आहे. मात्र, यंदा कोरोना परिस्थितीमुळे शाळा-महाविद्यालये बंद असून ऑनलाईनद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत दहावी बारावीच्या वार्षिक परीक्षा नेहमीप्रमाणे मार्च महिन्यात घेण्यात येणार नाहीत, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. परिस्थिती विचारात घेऊन पुढे परीक्षा घेण्यात येतील, असे सांगून त्यांनी मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा घेण्याचे संकेत दिले आहेत.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री सुरेशकुमार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण खात्याने सर्व प्रकारची तयारी केली आहे. उपलब्ध कालावधी विचारात घेतल्यानंतर अभ्यासक्रमात कपात केली जाणार आहे. शिक्षक संघटना आणि शिक्षण खात्यातील अधिकाऱयांशी चर्चा करून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे, असे ते म्हणाले.
किमान अध्ययनावर भर देण्यासाठी आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षांना हजर होणाऱया विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांच्या अभ्यासासंबंधी लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल. दहावी आणि बारावीसाठी बोर्डाची परीक्षा असल्याने त्यांच्यासाठी अभ्यासक्रम कपातीसंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यानंतर परीक्षेसंबंधीचा निर्णय घेतला जाईल. सध्या उपलब्ध शैक्षणिक कालावधी कमी असून दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यात परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
घाईगडबडीत निर्णय घेणार नाही
राज्यात 1 जानेवारीपासून दहावी आणि बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात विद्यागम योजना पुन्हा सुरू केली जाणार आहे. यासंबंधी शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले असून आपण घाईगडबडीत निर्णय घेणार नाही. ब्रिटनमध्ये नव्या स्वरुपाचा कोरोना आढळून आला असून राज्यातील शाळा 1 जानेवारीपासून सुरू कराव्यात का, यासंबंधी परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल. त्यासाठी आपल्याकडे अजून 9 दिवस आहेत. शाळा सुरू करण्यासंबंधी कोविड तांत्रिक सल्लागार समितीची पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले..
कोविड सल्लाकार समितीकडून मागविला अहवाल
राज्यात 1 जानेवारीपासून शाळा सुरू करावी की नाही, याबाबत कोविड तांत्रिक सल्लागार समितीकडून अहवाल मागविण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. ब्रिटनमध्ये नव्या स्वरुपाचा कोरोना आढळून आला असून त्याचा धोका विचारात घेऊन कोविड तांत्रिक सल्लागार समितीचा अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करून शाळा सुरू करण्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.