बायडेन यांच्या पत्नीनेही घेतला पहिला डोस
अमेरिकेत वाढते रुग्ण आणि लसीकरणासंबंधीची भीती पाहता नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीरपणे फायजर लसीचा पहिला डोस घेतला आहे. निश्चिंत रहा, ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. बायडेन यांच्या लसीकरणाच्या काही तासांनी त्यांची पत्नी जिल यांनीही लस टोचून घेतली आहे. दोघांना ही लस नेवार्क डेलावेयरच्या क्रिस्टीना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये देण्यात आली असून याचे वृत्तवाहिन्यांनी थेट प्रसारणही केले आहे.
डेमोक्रेटिक पार्टीच्या या सर्वात दिग्गज नेत्याने कॅमेऱयासमोर लसीकरण करून घेतले आहे. बायडेन यांना आता पहिला डोस देण्यात आला आहे. काही दिवसांनी त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. दुसऱया डोसची तारीख नियोजित अध्यक्षांचे वैद्यकीय पथक निश्चित करणा आहे. पहिला डोस घेतल्यावर बायडेन यांनी तेथे उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱयांचे आभार मानले आहेत.
लसीकरणाची भीती बाळगण्याची गरज नाही. माझ्या पत्नीनेही ही लस घेतली आहे. आमचे वैज्ञानिक आणि तज्ञांवर सर्वांनी विश्वास ठेवावा, असे उद्गार बायडेन यांनी लस टोचून घेतल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत काढले आहेत.
ट्रम्प यांना लस नाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही. उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी शुक्रवारी पत्नीसोबत लस टोचून घेतली आहे. ट्रम्प यांच्या पथकानेही ते अखेर लस कधी घेणार याची माहिती दिलेली नाही.
3 माजी अध्यक्षांचा पुढाकार
जाहीर स्वरुपात कोरोनाची लस घेण्याची घोषणा अमेरिकेच्या 3 माजी अध्यक्षांनी केली होती. याचा उद्देश लोकांमधील लसीची भीती दूर करणे हा होता. बिल क्लिंटन, जॉर्ज बुश ज्युनियर आणि बराक ओबामा यांनी थेट प्रसारित कार्यक्रमात लस घेणार असल्याचे म्हटले होते.