निवडणूक यंत्रणा सज्ज : किनारपट्टीवरील तालुक्यात मतदानाचे साहित्य पाठविण्यासाठी होडीचीही व्यवस्था
प्रतिनिधी/ कारवार
कारवार जिल्हय़ातील पहिल्या टप्प्यात 101 ग्राम पंचायतीसाठी उद्या दि. 22 रोजी होणाऱया मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यात दि. 22 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले कर्मचारी आज सोमवारी संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील पाच तालुक्यातील 101 ग्राम पंचायतीच्या निवडणूक रिंगणात एकूण 3 हजार 735 उमेदवार उतरले आहेत. यामध्ये कारवार तालुक्यातील 18 ग्राम पंचायतीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या 625 उमेदवारांचा समावेश आहे. किनारपट्टीवरील तालुक्यातील 4 लाख 51 हजार 297 मतदार एकूण 698 मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या भाडय़ाचा फैसला उद्या करणार आहेत.
एकूण मतदान केंद्रापैकी अतिसंवेदनशील मतदान केंद्राची संख्या 52 इतकी तर संवेदनशील मतदान केंद्राची संख्या 152 इतकी आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एकूण 3 हजार 795 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये पी. आर. ओ., एपीआरओपीओ आणि डी दर्जा कर्मचाऱयांचा समावेश आहे. मतदानासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱयांच्या आणि मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी 66 बसेस, 66 जीप्स, 96 टेंपो आणि एक होडीची व्यवस्था करण्यात आली आहे.
तयारीवर शेवटचा हात फिरविला
दरम्यान निवडणुक रिंगणात उतरलेल्या बहुतेक उमेदवारांनी आज सोमवारी आपल्या तयारीवर शेवटचा हात फिरविला. मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान केंद्राबद्दल आणि क्रमांकाबद्दल माहिती दिली. आजची रात्र अतिशय महित्त्वाची आणि निर्णायक असल्याने ही रात्र जागून काढण्याचा निर्णय अनेक उमेदवारांनी घेतला आहे. तर अन्य काही उमेदवारांनी शेवटच्या रात्री पैसा आणि दारुचे आमिष दाखवून मतदार आपल्याच गळाला कसे लागतील यासाठी धडपडणाऱयांनी अखेरचा प्रयत्न सोडायचा नाही, असा निर्णय घेतला आहे असे कळते.









