ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरातील गरजू देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरविण्यासाठी युनिसेफने पुढाकार घेतला आहे. जानेवारीपासून युनिसेफ दरमहिन्याला गरजू देशांना 850 टन कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पोहोचवणार आहे. युनिसेफच्या कार्यकारी संचालक हैनरिएटा फोर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
हैनरिएटा म्हणाल्या, युनिसेफ प्रत्येक महिन्याला जवळपास 850 टन लसीचे डोस गरजू देशांना पुरवण्यासाठी तयार आहे. लस विकसित करणाऱ्या देशांकडून गरीब देशांमध्ये 70 हजार फ्रीजची खरेदी करुन ते पुढील वर्षात बसवण्यात येतील. हे फ्रीज सौर ऊर्जेवर चालतील. या फ्रीजच्या माध्यमातून गरीब देशांमध्ये लस सहज उपलब्ध करुन दिली जाईल.
विविध देशांमध्ये लस पोहचविण्यासाठी व्यावसायिक विमानांचाच वापर करण्यात येईल. गरज भासल्यास चार्टर्ड विमानेही वापरली जातील, असे हैनरिएटा यांनी सांगितले.









