कराडच्या कोल्हापूर नाक्यावर पुन्हा भीषण अपघात
प्रतिनिधी/ कराड
येथील कोल्हापूर नाक्यावर भीषण अपघातात बळी जाण्याची मालिका सुरूच असून रविवारी दुपारी भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात काले (ता. कराड) येथील पती-पत्नी जागीच ठार झाले. धडक एवढी जोराची होती की दोघे पती पत्नी काही अंतरावर फरपटत गेले. नबीलाल महम्मद नदाफ (वय 64), अन्वरबी नबीलाल नदाफ (वय 59, दोघे रा. चावडी चौक, काले ता. कराड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काले येथील नबीलाल नदाफ गादी तयार करण्याचे काम करत होते, तर त्यांच्या पत्नी अन्वरबी नदाफ यांचा बांगडय़ांचा व्यवसाय होता. हे दोघे पती-पत्नी कुटुंबासह चावडी चौक काले येथे राहत होते. रविवारी दुपारी हे पती-पत्नी कामानिमित्त कराडला आले होते. कोल्हापूर नाक्यावरून प्रवास करत असताना त्यांच्या दुचाकीला कोल्हापूर बाजूकडून आलेल्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. धडक एवढी जोराची होती की दुचाकीसह नदाफ पती-पत्नी फरपटत काही अंतरावर गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची दुचाकी महामार्गावरच बाजूला पडलेली होती. अपघात झालेल्या ठिकाणावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. अपघातानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळाकडे धावले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, उपनिरीक्षक भरत पाटील, अपघात विभागाचे खलील इनामदार, प्रशांत जाधव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, रमेश खुणे, मानसिंग सूर्यवंशी, विक्रम सावंत, आदर्श अडसूळ तातडीने अपघातस्थळी दखल झाले. पोलिसांनी मृतांच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटवली. गाडीच्या नंबरवरूनही ते दाम्पत्य काले येथील असल्याचे समोर आले. मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठवले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले. अपघातात दुचाकी व ट्रकचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद शहर पोलिसांत करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.








