प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी व्हॅक्सिन डेपो ग्राऊंडजवळच्या स्काऊट ऍण्ड गाईड कार्यालयासमोरील ट्रान्स्फॉर्मर धोकादायक स्थितीत आहे. जुने विद्युत खांब मोडकळीला आले असून, संरक्षक जाळीही खराब झाली आहे. या परिसरात अनेक खेळाडू, नागरिक खेळण्यासाठी येतात. त्यामुळे कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी या ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांमधून केली जात आहे.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर दररोज शेकडो नागरिक मॉर्निंग वॉक तसेच खेळण्यासाठी येतात. क्रिकेटचा चेंडू या ट्रान्स्फॉर्मरच्या जाळीजवळ पडत असल्याने खेळण्याच्या नादात त्या तुटलेल्या जाळीकडे दुर्लक्ष होत आहे. तुटलेल्या जाळीमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. याचप्रमाणे सायंकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत या मैदानावर ऍथलिट्स सराव करीत असताना हे खेळाडू वारंवार त्या जाळीकडे जात असलेले दिसून येत आहेत. लॉकडॉऊनच्या काळात त्या जाळीशेजारी एका खेळाडूला विजेचा सौम्य धक्काही बसला होता. याची तक्रार हेस्कॉमकडे करण्यात आली होती. तरीदेखील ट्रान्स्फॉर्मर तसेच त्याच्या जाळीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
शहरात सर्वत्र स्मार्ट सिटीअंतर्गत सिंगल पोल ट्रान्स्फॉर्मर बसविले जात आहेत. ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी असे ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले आहेत. परंतु गरज असणाऱया ठिकाणी मात्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यानंतरच हेस्कॉमला जाग येणार का? सध्या लहान मुले दिवसभर या परिसरात वेगवेगळे क्रीडाप्रकार खेळत आहेत. त्यांना विजेचा धक्का बसल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न खेळाडू, त्यांचे पालक व रहिवाशांमधून उपस्थित केला जात आहे.