वार्ताहर / कास
जगप्रसिद्ध असे कास पुष्प पठार हे लॉकडाऊननंतर पर्यटकांनी बहरू लागले आहे. कास पठारावर फुलांचा हंगाम नसला तरी सध्या हवामान पालटण्यासाठी अनेक पर्यटक कास पुष्प पठारावर भेट देत आहेत. कास पुष्प पठारावर नुकतेच गव्याच्या कळपाचे पर्यटकांना दर्शन झाले.
जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर रानगव्यांच्या कळपाचे दर्शन वाहनधारकांना वारंवार होत आहे. पुष्प पठारावरून कास तलावाच्या बाजूला उतरताना कास पार्किंगच्या अलीकडच्या वळणावर हा कळप निवांत पणे चराई करताना दिसत आहे. तब्बल आठ ते नऊ रानगव्यांचा कळप या ठिकाणी पहावयास मिळत आहे. कास पुष्प पठारावरील तारेच्या कंपाउंडमुळे या कळपाला इकडे तिकडे ये जा करता येत नाही. कास पुष्प पठाराच्या संपूर्ण परिसरात हे कळप वारंवार दिसत असल्याचे वाहन चालक सांगत आहेत.
जागतिक पुष्प पठार अशी ओळख असलेल्या कास पठारावर जंगली प्राणाचा वावर वारंवार आढळून येतो. कधी बिबट्या, कधी अस्वल तरी कधी मोर पहायला मिळतात.पण रान गव्यांचे कळप आज पर्यत कधी पाहिले नसल्याचे स्थानिक सांगतात.गेल्या चार दिवसांपूर्वी कास रस्त्यावर चक्क रान गव्यांचा कळप पर्यटकांना पहायला मिळाला.कास पठारावर हवा पालट करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हे गवे पाहून काही वेळा भीती ही वाटली पण पुन्हा त्यांनी आनंद घेतला.
लाल, पिवळी, निळी,पांढरी विविध रंगाची फुले यावर्षी पुष्प पठारावर उमलली आणि कोमेजली ही परंतु पर्यटक लॉकडाऊनमुळे पहायला गेले नाहीत. यावर्षीचा हंगाम पूर्णपणे कोरडा गेला आहे. कास पठारावर आजपर्यंत जंगली प्राणी आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत.अगदी अस्वलाच्या हल्ल्यात स्थानिक जखमी झाले आहेत. बिबट्या, रान डुक्करे असे प्राणी निदर्शनास येतात.परंतु गेल्या चार दिवसांपूर्वी कास पुष्प पठारावर चक्क रानगव्यांचा कळप पहायला मिळाला. या पठारावर सुरुवातीला स्थानिकांनी ही हा रान गव्यांचा कळप असेल असे वाटले नाही परंतु रानगवे पाहून स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटक ही अचंबित झाले. नुकतेच पुणे शहरात रानगव्याचा मृत्यू भीतीने झाल्याची घटना घडली.









