सत्ताधारी लोकप्रतिनिधी, अधिकाऱयांचा संगनमताने भ्रष्टाचार : परशुराम उपरकर यांचा आरोप
प्रतिनिधी / कणकवली:
शासन व महसूलचे अधिकारी सत्ताधाऱयांना घाबरत नाहीत, विचारतही नाहीत. सत्ताधारी लोकप्रतिनिधी व अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार करत आहेत. अवैध वाळू व्यवसायाबाबत सातत्याने निवेदने, बातम्या येऊनही, आंदोलने होऊनही प्रशासन डोळेझाक करत आहे. खासदार, आमदार, पालकमंत्री याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर उपस्थित होते.
उपरकर म्हणाले, अवैध वाळू व्यवसायाबाबत महसूल प्रशासन, खनिकर्म, बंदर विभाग, आरटीओ सारेच दुर्लक्ष करत आहेत. दोन ब्रास वाळू वाहतुकीचा परवाना असलेल्या डंपरमधून तीन ते चार ब्रास वाळूची वाहतूक केली जाते. सिंधुदुर्गमधून मोठय़ा प्रमाणात वाळू गोव्याला नेली जाते. पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात ही सारी वाहतूक कैद होत असतानाही त्याबाबत कारवाई हा होत नाही? अशाप्रकारे वाहतूक करणे म्हणजे शासनाच्या महसुलाची चोरी आहे. अशा चोरी करणाऱयांनाच लोकप्रतिनिधी, अधिकारी पाठिशी घालत असल्याचा जनतेत समज आहे. गोव्याला या गाडय़ा जाताना एकाच सीमेवरून पुढे जातात. मग आरटीओ, पोलीस प्रशासन काय करते? पैसे घेऊन या गाडय़ा पुढे जात असून प्रशासन जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीय.
मनसेच्या शिष्टमंडळातर्फे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. मात्र, त्यांनीही कारवाईत उदासिनता दाखविली. खनिकर्म अधिकारी, तहसीलदार हे कागदी घोडे नाचविण्याचे काम करतात. या साऱयाकडे पालकमंत्री, खासदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बदलीबाबत चुकीच्या पद्धतीने शक्तीचा वापर केला. मॅटने आपल्या निर्णयात याबाबतचा उल्लेख करत त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मॅटच्या निर्णयाने त्यांना चपराक बसली असल्याचेही उपरकर म्हणाले.
जलक्रीडा व्यवसायाबाबतही सत्ताधारी मंडळी त्याच पद्धतीने वागत आहे. खासदार आता मुख्यमंत्र्यांना निवेदन देतात. मात्र, पत्र देऊन हे सुरू होणार का? खासदार, आमदार, पालकमंत्री ही सारी मंडळी निवेदने देणे व फोटो काढण्यापुरतेच काम करतात. जनतेने निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी कूचकामी ठरले असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. ͎: