प्रतिनिधी/ पणजी
गोवा मुक्तीचे हिरक महोत्सवी वर्ष आजपासून मोठय़ा दिमाखात प्रारंभ होत आहे. या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज शनिवारी दुपारी गोव्यात दाखल होत असून सायंकाळी 6 वाजता येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर विशेष समारंभात त्यांच्याहस्ते या सोहळ्याचे शानदार उद्घाटन होणार आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिरक महोत्सवानिमित्त राजधानी कटआऊटस्, मोठमोठे होर्डिंग्ज, विद्यूत रोषणाईने सजली आहे. आझाद मैदान, कांपाल परेड मैदान, बांदोडकर मैदान, तसेच अनेक सरकारी कार्यालयांना झळाळी प्राप्त झाली आहे. रस्त्यांची सफाईही सकाळ संध्याकाळ होत असल्याने आझाद मैदान ते मिरामार, दोनापावला रस्ता चकाचक झाला आहे.
आज सकाळी 9.15 वाजता कांपाल परेड मैदानावर गोवा मुक्तीदिन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
राष्ट्रपतींचे गोव्यात दोन दिवस वास्तव्य

दोन दिवसांच्या मुक्कामासाठी राष्ट्रपती गोव्यात दाखल होत आहेत. आज दुपारी 1.05 वाजता विशेष विमानाने त्यांचे दाबोळी हंस तळावर आगमन होईल. तेथून हॅलिकॉप्टरद्वारे ते गोवा विद्यापीठाच्या हेलिपॅडवर उतरतील. हंस तळावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपतींच्या पाहुणचारासाठी सज्जता
राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी, पूत्र व कन्या येणार आहेत. त्याशिवाय अनेक अधिकारी, राष्ट्रपतींचे वैद्यकीय अधिकारी, एडीसी, पीएसओ, टूर अधिकारी, व्हीडिओग्राफर असा 41 जणांचा ताफा दाखल होणार आहे. त्यांच्या दिमतीला तीन हॅलिकॉप्टर्स, चार इनोव्हा कार आणि बॅगा व अन्य साहित्य उचलण्यासाठी अतिरिक्त 10 माणसे असणार आहेत. राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मुक्कामासाठी राजभवनवरील दहा सूट आणि दहा खोल्या सुसज्ज करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतींसोबत येणाऱया अधिकाऱयांसाठी अन्य सूटमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय काही अधिकारी खाजगी हॉटेलमध्येही मुक्काम करणार आहेत.
आझाद मैदानावर हुतात्म्यांना वाहणार श्रद्धांजली
सायंकाळी 5.40 वाजता राष्ट्रपतींचे आझाद मैदानावर आगमन होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत तेथील हुतात्मा स्मारकास ते पुष्पचक्र वाहणार आहेत.
भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर मुख्य महासोहळा
आझाद मैदानावरुन ते कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर होणाऱया मुख्य कार्यक्रमास उपस्थित राहतील. राष्ट्रपती या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. सायंकाळी 6 वाजता हा सोहळा सुरू होईल. त्यात प्रारंभी भांगराळे गोंय या संस्थेच्या कलाकारांतर्फे संस्कृतीगीताने राष्ट्रपतींचे स्वागत होईल. त्यानंतर गोमंतकीय कला संस्कृती, परंपरा, तसेच मौर्यकाळ, कदंबकाळ ते मुक्तीसंग्रामापर्यंतचा इतिहास यावर आधारित माहितीपट दाखविण्यात येईल. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींसाठी ‘गोंयचो गाज’ या दीड तासांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. त्यात बाराही तालुक्यातील वेगवेगळी सांस्कृतिक पथके गोव्यातील धार्मिक एकोपा, कला, संस्कृती, स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास यांचे दर्शन घडवतील. सुमारे 200 कलाकार या कार्यक्रमातून सहभागी होतील.
दि. 20 रोजी सकाळी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यासमवेत राष्ट्रपती चहापान करतील. त्यानंतर दुपारपर्यंत ते एक – दोन वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होतील. राष्ट्रपतींच्या दि. 20 रोजीच्या कार्यक्रमांविषयी गुप्तता पाळण्यात आली असून कोविडमुळे सरकारी मेजवानीही रद्द करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण
कार्यक्रमास मर्यादित मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आले आहेत. तरीही संपूर्ण गोमंतकीय जनतेलाही हा कार्यक्रम पाहता यावा यासाठी त्याचे लाईव्ह प्रसारण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी गोव्यातील सर्व चॅनल मिडियाशी समन्वय करार करण्यात आला आहे.
हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक, भारतीय सैनिकांना वंदन : राज्यपाल

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्यातील लोकांना ऐतिहासिक गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. भारतीय लष्कराच्या जवानानी धाडस आणि शौर्य दाखवून 1961 साली याच दिनी गोव्याला 450 वर्षाच्या परकीय पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केले आणि गोव्याला आपल्या भारतभूमीचा अविभाज्य भाग बनविला. गोव्याला मुक्त करण्यासाठी ज्या थोर व्यक्तीनी आणि महिलांनी आपल्या बहुमुल्य जीवनाचा त्याग केला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास हा योग्य प्रसंग आहे, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.
गोव्यातील लोकांबरोबर देशाच्या इतर भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी या ऐतिहासिक गोवा मुक्ती चळवळीत भाग घेतला. या संस्मरणीयदिनी शूर आणि धाडशी सैनिकांचे त्याचप्रमाणे निस्वार्थ स्वातंत्र्यसैनिकांना आपण अभिवादन करूया. गोवा हा केवळ भव्य समुद्र, भव्य चर्चेस आणि भव्य मंदिरांसाठी थोर नसून गोवा त्यांच्या आनंदी, शांतताप्रिय आणि मेहनती लोकांसाठीही प्रसिध्द आहे ज्यांनी कला, साहित्य,संगीत, स्थापत्य कला, पर्यटन, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सार्वजनिक जीवनात मोठे योगदान दिले आहे.
मुक्तीनंतरच्या काळात लोकांच्या सामाजिक-आर्थिक आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गोव्याने भरीव प्रगती साधली आहे. गोवा देशातील सर्वात विकसित राज्यांमध्ये गणले जाते याचा आपण सर्वानी अभिमान वाटून घ्यायला हवा. देशामध्ये गोव्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे ही अभिमानाची बाब आहे. कित्येक वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि पूल अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून सरकारने राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. गोवा हे जगातील उत्कृ÷ पर्यटक स्थळ बनले असून पर्यटन क्षेत्राने अर्थ व्यवस्थेला मोठय़ाप्रमाणात हातभार लावला आहे. गोवा हा जातीय सलोखा आणि शांततेसाठी लोकप्रिय आहे.
माझे सरकार गोव्याच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी प्रशंसनीय कामगिरी बजावित आहे. नीती आयोगाने कोविड- 19 व्यवस्थापनाच्या नाविन्यपूर्ण शमन आणि व्यवस्थापन पध्दतीचे आणि कोविड महामारीशी लढा देण्यासाठी कोरोना योध्यांच्या उत्कृ÷ कामगिरीची प्रशंसा केली. प्रधानमंत्र्यांचे आत्मनिर्भर भारताचे उद्दीष्ट साधण्यासाठी गोवा सरकारने स्वयंपूर्ण गोवाचा शुभारंभ केला आणि हे थोर उद्दीष्ट साधण्यासाठी एक व्यापक योजना आणि यंत्रणा तयार केली.
60 व्या मुक्ती समारंभाचा प्रारंभ असल्याने या वर्षाच्या या शुभदिनास खास महत्व प्राप्त झाले आहे. हा दिवस योग्यप्रकारे साजरा करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. भारताचे राष्ट्रपती या वर्षभर साजरा करण्यात येणाऱया उद्घाटन समारंभात सहभागी होत आहे ही आनंदाची बाब आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गोव्याची कला, संस्कृती आणि गेल्या 60 वर्षाचा राज्याचा प्रवास यांचे दर्शन घडविण्यात येईल.
या महत्वपूर्ण दिनी आपण सर्वानी गोव्याला देशातील उत्कृ÷ राज्य बनविण्याचा संकल्प करूया आणि आपला समृध्द सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हातात हात घालून काम करूया, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.
हुतात्म्यांच्या, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे स्वातंत्र्य : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना गोवा मुक्तिदिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. हा दिवस गोव्याच्या इतिहासातील महत्वाचा दिवस आहे. याचदिनी गोवा 450 वर्षाच्या पोर्तुगीजांच्या परकीय सत्तेतून मुक्त झाला. गोव्याच्या मुक्तीसाठी आपल्या स्वतंत्र्यसैनिकांनी खूप त्रास सहन केले, हुतात्म्यांनी आपल्या जीवाचा त्याग केला. त्यांच्या त्यागामुळे आज आपण आनंदाचे जीवन जगतो. त्याना आपण आजच्या याप्रसंगी नमन करूया. मुक्तीनंतर गोवा राज्याने आपल्या सामाजिक, सांस्कृतिक वारशाचे जतन करून सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात भरीव प्रगती साधली आहे. राज्याने शाश्वत विकासाबरोबरच नैसर्गिक जतनावर भर दिला आहे. आजच्या या प्रसंगी आपण राज्याच्या पुढील विकासासाठी संकल्प करूया तसेच शांतता आणि सलोख्याच्या वारशाचे जतन करण्यास योगदान देऊया, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
स्वातंत्र्यसैनिकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 19 डिसेंबर 2020 रोजी आझाद मैदान आणि दयानंद बांदोडकार मैदान, कांपाल येथे होणाऱया गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्ष समारंभास स्वातंत्र्यसैनिकांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले आहे.
या समारंभास स्वातंत्र्यसैनिकांना हजर राहण्यासाठी माहिती आणि प्रसिध्दी संचालनालयाने स्वातंत्र्यसैनिकांना गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि गोवा, दमण आणि दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेमार्फत निमंत्रण कार्डे पाठविली आहेत. ज्या स्वातंत्यसैनिकांना निमंत्रण कार्ड मिळाले नाही त्यांनी आझाद मैदान, आणि दयानंद बांदोडकार मैदान, कांपाल येथे कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळविण्यासाठी आपले स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र दाखवावे, असे माहिती आणि प्रसिध्दी संचालनालयाने कळविले आहे.









