सोनिया गांधी आजपासून 7 दिवस पक्षाच्या नेत्यांना भेटणार : तक्रारी अन् धोरणांवर चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागील काही महिन्यांमध्ये काँग्रेसमध्ये विरोधाचे सूर उमटले होते. परंतु आता राजकीय कलह दूर करण्यासाठी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीच सरसावल्या आहेत. सोनिया गांधी आजपासून एक आठवडय़ापर्यंत काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भेटून चर्चा करणार आहेत. या चर्चेत संबंधित नेत्याच्या तक्रारींसह पक्षाच्या पुढील वाटचालीचा मुद्दाही उपस्थित होणार आहे. या बैठकीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी चर्चा होणार आहे. पक्षात सुधारणा घडवून आणा असे सुचविणाऱया नेत्यांनाही सोनिया गांधी भेटणार आहेत.
अहमद पटेल यांच्या निधनानंतर एक माजी मुख्यमंत्री सोनिया गांधी यांना भेटले होते. या नेत्यानेच सोनियांना पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन मतभेद दूर करण्याचे आवाहन केले होते. पहिल्या तुकडीत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा, राज्यसभा खासदार आणि वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सोनिया गांधी भेटू शकतात.
बंगाल-तामिळनाडू निवडणुकीवर चर्चा
पक्षशेष्ठींकडून ही बैठक आयोजित करण्यात आली ही चांगली बाब आहे. या बैठकीत अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा होईल असे एका प्रदेशाध्यक्षाने म्हटले आहे. बैठकीत प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा होऊ शकते.
जनसंपर्कच संपविला
एक महिन्यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. पंचतारांकित संस्कृतीद्वारे निवडणूक जिंकता येणार नाही, उमेदवारी मिळाल्यावर आजचे नेते सर्वप्रथम पंचतारांकित हॉटेल बुक करतात हीच समस्या आहे. खराब रस्त्यांवर हे नेते उतरत नाहीत. ही पंचतारांकित संस्कृती जोपर्यंत सोडली जात नाही, तोवर कुठलीच निवडणूक जिंकता येणार नाही. मागील 72 वर्षांमध्ये काँग्रेस आता नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. काँग्रेसकडे मागील दोन कार्यकाळांदरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदही नसल्याचे आझाद यांनी म्हटले होते.
सोनिया गांधींना पत्र काही महिन्यांपूर्वीच पक्षाच्या 23 नेत्यांनी याप्रकरणी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांच्यासह गुलाम नबी आझादही सामील होते. पत्रात पक्षात सर्वोच्च स्तरावरून खालपर्यंत बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. पत्र लिहिणाऱया नेत्यांवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपशी संगनमत केल्याचा आरोप करण्यात आल्याने सिब्बल आणि आझाद नाराज झाले होते. बिहार निवडणुकीतील पराभवानंतर सिब्बल यांनी काँग्रेसने बहुधा प्रत्येक निवडणुकीत पराभव होणार हे गृहितच धरल्याचे हताश उद्गार काढले होते. सिब्बल यांचे हे विधान पक्षाचे नेतृत्व म्हणजेच सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावरील टीकास्त्र असल्याचे मानले गेले होते.









