प्रतिनिधी/ बेळगाव
चिदंबरनगर येथील रस्त्याच्या विकासासाठी चांगली झाडे तोडण्याचा प्रकार स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू आहे. सदर झाडे हटविण्यात येऊ नयेत, अशी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने येथील रहिवाशांनी शुक्रवारी निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला. पर्यावरणाचा ऱहास करणारी विकासकामे थांबवा, अशी मागणी करण्यात आली.
स्मार्ट सिटी योजनेच्या नावाखाली शहरातील वनराईचा ऱहास करण्यात येत आहे. यापूर्वी येथील दोन झाडे तोडण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा आणखी तीन झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी संघटनेच्यावतीने याला आक्षेप घेण्यात आला असून शुक्रवारी चिदंबरनगर येथे धाव घेऊन झाडे तोडल्याबद्दल निदर्शने केली. विकासकामे राबविण्यास विरोध नाही, मात्र झाडे न तोडता विकास करा, अशी मागणी करण्यात आली.
विकासाच्या नावाखाली शहरातील हजारो झाडांची कत्तल आतापर्यंत करण्यात आली आहे. शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आलेली झाडे अवघ्या तासाभरातच भूईसपाट करून पर्यावरणावर घाला घालण्यात येत आहे. ही झाडे तोडण्यास कोणत्या कायद्यांतर्गत परवानगी दिली, असा मुद्दा उपस्थित करून प्रशासन आणि वन खात्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
यावेळी दीपक अवर्सेकर, अविनाश वेलंगी, सुनीता पाटणकर, संगम कक्केरी आदी उपस्थित होते.
झाडेतोड थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू
चिदंबरनगर तसेच एस. व्ही. रोड अशा विविध ठिकाणांची झाडे तोडण्याचा प्रकार स्मार्ट सिटीसाठी सुरू आहे. स्मार्ट सिटी करण्यास कोणताच विरोध नाही. पण याकरिता झाडांची कत्तल का? झाडे न तोडता विकास करा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी दीपक अवर्सेकर यांनी केली. झाडे लावा, झाडे जगवा, असा संदेश देणाऱया वन खात्याने झाडे तोडण्यास कोणत्या आधारावर परवानगी दिली, असा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वी अनेक झाडे तोडून पर्यावरणाचा नाश करण्यात आला आहे. यापुढे झाडेतोड थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा अवर्सेकर यांनी दिला.
यापुढे झाडे तोडल्यास पर्यावरणप्रेमी शांत राहणार नाहीत
पर्यावरण वाचविण्यासाठी झाडे जगवावी लागतात. वर्षानुवर्षे झाडांचा सांभाळ केल्यानंतर मोठी होतात. पण सदर झाडे गटार बांधकामासाठी किंवा रस्ते करण्यासाठी काही क्षणार्धातच तोडत आहेत. ही बाब चुकीची आहे. पर्यावरणाचा ऱहास करून आपण मृत्यू ओढवून घेत आहोत. गटार बांधण्यासाठी झाड तोडण्याऐवजी गटारीची जागा बदला. यापुढे झाडे तोडल्यास पर्यावरणप्रेमी शांत राहणार नाहीत, असा दम अविनाश वेलंगी यांनी दिला.









