प्रतिनिधी/ चिकोडी
नागरमुन्नोळी भागात रब्बी हंगामात घेण्यात आलेली हरभरा, गहू, ज्वारी, मका आदी पिकांना पाण्याची गरज असून पाण्याअभावी ही पिके वाळत आहेत. शेती पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे. शेतकऱयांच्या हिताच्या दृष्टीने हिडकल जलाशयातून चिकोडी उपविभागाच्या सीबीसी कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी नागरमुन्नोळी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष सिद्धाप्पा मऱयायी यांनी केली.
नागरमुनोळी येथे ते बोलत होते. ते म्हणाले, रब्बी हंगामात पिके चांगली आली असून सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. एक वेळ कालव्यात पाणी सोडल्यास ही पिके शेतकऱयांना अधिक उत्पन्न देऊन जातील. त्यामुळे तातडीने कालव्यात पाणी सोडण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी राजू कुंभार, लक्ष्मीसागर ईट्टी, बाळाप्पा बाणी, विनायक कुंभार, अनिल ईट्टी उपस्थित होते.









