मतदारांच्या संपर्कात वाढ : प्रभागातील विविध कार्यक्रमांना इच्छुकांची उपस्थिती ग्रामपंचायतीचा महसूल वाढला
वार्ताहर / कुंभोज
कुंभोज ता. हातकणंगले येथील येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली असून, आपल्या प्रभागातील नेतेमंडळी यांच्या गाठीभेटी घेऊन इच्छुक उमेदवाराचा प्रभागातील तरुणांशी संपर्क मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे चित्र दिसत आहे.
परिणामी अद्याप सदर निवडणुकीच्या वाऱ्यांना म्हणावे अशी रंगात आली नसून फक्त इच्छुक उमेदवार आपल्या मताची चाचपणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. या वेळच्या निवडणुका गटातटाचे राजकारण न पाहता व्यक्तिगत पातळीवर होतील अशी चर्चाही रंग धरत आहे. परिणामी 17 सदस्यीय असणारी कुंभोज ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या विषयावरुन हातकणंगले तालुक्यात सतत चर्चेचा विषय बनत राहिली आहे, कुंभोज हा जिल्हा परिषद मतदार संघ असुन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा आमदार घडवण्याची ताकद सदर गावांमध्ये आहे. परिणामी अद्याप आजपर्यंत सदर ठिकाणी एक हुकमी सत्ता स्थापन करण्यास गावातील सर्वच राजकीय नेत्यांना अपयश आले असून, यावेळी मात्र ग्रामस्थांनी एक हुकमी सत्ता असणारे सदस्य ग्रामपंचायतीवर पाठवावेत व गावचा सर्वांगीण विकासासाठी एक हुकमी कारभार करावा, तसेच युवकांच्या बरोबर कामाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना निवडणुकीची संधी देऊन गावच्या विकास करण्यासाठी हातभार लावावा अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
इच्छुक उमेदवार सध्या मोबाईलद्वारे आपल्या उमेदवाराची घोषणा करत असून आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत, परिणामी यासाठी इंटरनेट मीडिया फार महत्त्वाची भूमिका घेत आहे. लवकरच निवडणुकीचे फॉर्म भरायची तारीख जवळ येत असल्याने इच्छुक उमेदवार आपली सरकारी कागदपत्रे पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ झाली असून इच्छुक उमेदवारानी घरफाळा पाणीपट्टी भरून आपल्या प्राथमिक निवडणूक तालमीस सुरुवात केली आहे. काही उमेदवार आपल्या नेत्याची मनधरणी करत असून सदर प्रभागांमध्ये आपण कसे मातब्बर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. नेत्यांनी व इच्छुक उमेदवारांनी गावातील सर्वच कार्यक्रमांना सध्या हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, लग्नसमारंभ, मयत अशा विविध ठिकाणी उपस्थिती लावून आपण मतदार राजा सोबतच असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.
कुंभोज ग्रामपंचायतीसाठी किती पॅनेल होणार, लढत दुरंगी होणार का तिरंगी हे मात्र येणारे वेळ व काळच ठरवेल. सध्या कुंभोज येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, शेतकरी संघटना जनसुराज्य, मनसे, प्रहार संघटना, बहुजन वंचित आघाडी, आर पीआय या सर्वच गटाचे कार्यकर्ते मातब्बर आहेत परिणामी येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाची युती होणार यावर कुंभोज ग्रामपंचायत उमेदवारी चा आराखडा ठरणार आहे. परिणामी सदर उमेदवार यादीत आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुक उमेदवार आपापल्यापरीने सर्वच गटातील नेते व कार्यकर्त्यांना भेटून आपण कसे उमेदवारीसाठी योग्य आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.









