बाजारात तेजीचा प्रवास कायम : विदेशी गुंतवणुकीचा प्रभाव
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय शेअर बाजारात मागील विविध सत्रांमध्ये सुरु असणाऱया विदेशी गुंतवणुकीच्या प्रभावामुळे व जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारातील तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. याचाच परिणाम म्हणून सलग पाचव्या व्यापारी सत्रात मजबूत स्थिती प्राप्त करुन तेजीची घोडदौड कायम ठेवण्यात भारतीय शेअर बाजाराला यश मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीच्या बळावर दिवसअखेर सेन्सेक्सने 224 अंकांच्या वधारासह नवीन उंची प्राप्त केली आहे. यामध्ये एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टीसीएस तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यांच्या समभागांमुळे शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. दिवसअखेर सेन्सेक्सचा निर्देशांक 223.88 अंकांनी वधारुन 46,890.34 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीचा निर्देशांक 58 टक्क्यांच्या वधारासह 13,740.70 वर स्थिरावला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये एचडीएफसीचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी वधारले आहेत. सोबत बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, टेक महिंद्रा आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये ओएनजीसी, मारुती सुझुकी, टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज ऑटो आणि सन फार्माचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
भारतीय बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलियोतील गुंतवणूकदारांनी बुधवारी निव्वळ स्वरुपात 1,981.77 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. आशियातील शांघाय, हाँगकाँग आणि टोकीयो हे लाभात राहिले आहेत.
सेन्सेक्सचा प्रवास विक्रमाकडे
सेन्सेक्स 46 हजारच्या पुढे प्रवास करत असून अभ्यासकांनी लवकरच निर्देशांक 50 हजारावर पोहोचण्याचे संकेत व्यक्त केले आहेत.









