लडाखमधील तणावावर चिंता : भारताला आवश्यक सामग्री पुरविली
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या तणावावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. चीनसोबतच्या सैन्यविषयक तणावादरम्यान अमेरिका भारतासोबत ठामपणे उभा राहिल्याचे उद्गार व्हाइट हाउसमधील अधिकाऱयाने काढले आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि भारतामधील संरक्षण सहकार्य प्रचंड वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी स्वतःच्या कार्यकाळादरम्यान भारतासोबत सुरक्षेच्या सर्व पैलूंना आणि संरक्षण सहकार्याला बळकट केले आहे. हाँगकाँग, तैवान, दक्षिण चीन समुद्र आणि भारत-चीन सीमेसमवेत जगातील अन्य हिस्स्यांमध्ये चीनच्या वाढत्या आक्रमकतेप्रकरणी चिंता वाटत असल्याचे संबंधित अधिकाऱयाने सांगितले आहे.
भारतासोबत अमेरिका
मागील 6-7 महिन्यांपासून सीमेवर चीनच्या आक्रमक भूमिकेदरम्यान अमेरिका भारतासोबत उभा राहिला आहे. भारताला आवश्यक सामग्री उपब्लध केली आहे. चीनविरोधात उभे राहण्यासाठी अमेरिकेने नैतिक समर्थन दिले आहे. स्थितीवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा या दृष्टीने पावले उचलल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे.
ड्रोन पुरविले
ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका हा भारताला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे. चीनसोबतच्या तणावादरम्यान भारताला अमेरिकेने दोन एमक्यू-9 (मानवरहित ड्रोन) ही भाडेतत्वावर उपलब्ध केले असून याच्या विक्रीला अंतिम स्वरुप दिले जात आहे. भारतीय सैन्याला थंडीच्या अनुकुल पोशाख आणि आवश्यक सामग्री उपलब्ध करणार असल्याचे अधिकाऱयाने सांगितले आहे.









