पोंभुर्लेतील युवकाची दर्दभरी कहाणीः नोकरी सुटल्याने गावी केली अत्याधुनिक शेती : अज्ञाताने पॉवर टिलर, रोपांना लावली आग : आत्मनिर्भरतेचे स्वप्न एका रात्रीत उद्ध्वस्त
प्रशांत वाडेकर / देवगड:
कोरोनाच्या संकटात नोकरी गेली आणि एका होतकरु तरुणाने गावाची वाट धरली. पण, शेतकरी कुटुंबातील हा युवक घरी स्वस्थ बसणारा नव्हता. वडिलोपार्जित शेतीच आर्थिक उत्पन्नाचे स्रोत बनवावी, असे त्याने मनोमन ठाणले व तो आधुनिक शेतीसाठी पैशांची जमवाजमव करू लागला. पैसे जमले, शेतीही रुजली. मात्र, त्याच्या या ‘लाखमोला’च्या कष्टाला नजर लागली. एका अज्ञात समाजकंटकाने त्याच्या शेतीतील पिके व शेतीपयोगी साहित्य रात्रीच्या सुमारास पेटवून दिले अन् त्या युवकाचे स्वप्न एका रात्रीत उद्धवस्त झाले. ही कहाणी आहे, देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावातील अमित भिवा तेरवणकर या 25 वर्षीय युवकाची.
पैसे कमविताना आलेल्या कष्टाला मोठी किंमत असते. हे कष्ट खऱया अर्थाने बळीराजाच्याच नशिबी असतात. अमित हा युवकही शेतकरी कुटुंबातील. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीतून मिळणाऱया तुटपुंज्या उत्पन्नावरच. आई-वडील, भाऊ-बहीण असे त्याचे कुटुंब. बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करुन कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी अमितने मुंबई गाठली. तेथे त्याला खासगी कंपनीत नोकरी मिळली. काही महिने सुरळीत गेले. पण, कोरोनाच्या महासंकटात कंपनी बंद पडल्याने अमितची नोकरी गेली. मार्च 2020 पासून कोरोनाच्या मुंबईतील वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन कालावधीत दिवसेंदिवस वाढ होत राहिल्याने पुन्हा कंपनी सुरू होणे शक्य नव्हते. कोरोनाच्या संकटामुळे मुंबईसारख्या ‘कार्पोरेट’ क्षेत्रालाही मोठा हादरा बसला होता. अनेकांच्या नोकऱया गेल्या. त्यात पुन्हा आपल्याला नव्या ठिकाणी नोकरीची संधी कशी मिळेल, या विवंचनेत असणाऱया अमितला अखेर त्याच्या आई-वडिलांनी गावी परतण्याचा आग्रह धरला.
आधुनिक शेतीसाठी जमविले सात लाख
अमित हा अत्यंत होतकरू असल्याने गावात येऊन स्वस्थ बसून राहणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे त्याने आपली वडिलोपार्जित शेती आधुनिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या सहमतीनंतर त्याने पैशांची जमवाजमव सुरू केली. शेतीसाठी लागणारी अत्याधुनिक अवजारे, बी-बियाणे, खते, पॉवर टिलर, वाहन यासाठी मोठा खर्च अपेक्षित होता. त्यानुसार त्याने वडिलांच्या मदतीने सात लाख रुपये जमविले. सर्व शेतीपयोगी साहित्य खरेदी करून त्याने आधुनिक शेतीचा शुभारंभ केला.
सतरा प्रकारच्या भाजी लागवडीने फुलली शेती
पोंभुर्ले रतांब टेंबवाडी येथे सुकनदीलगत असलेली वडिलोपार्जित शेतजमीन कसण्यास त्याने सुरुवात केली. वांगी, टॉमेटो, भेंडी, शिमला मिरची, कारली, वरणा, काकडी, अलकुल, मुळा, पालक, लालमाट, कोबी, दोडकी, मका, मिरची, चवळी, वाल, मटार, पडवळ, कलिंगड, मेथी अशा विविध 17 विविध प्रकारच्या भाज्यांची त्याने आधुनिक पद्धतीने लागवड केली. त्यासाठी वाफे तयार केले. स्थानिक दहा ते बारा मजुरांनाही त्याने आपल्या शेतीत काम देऊन त्यांना रोजगार मिळवून दिला. अमितच्या संपूर्ण कुटुंबानेही या शेतीत विशेष मेहनत घेतली.
अमितचे स्वप्न एका रात्रीत उद्धवस्त
शेती चांगल्याप्रकारे तयार होत असल्याने अमित व त्याचे कुटुंब समाधानी होती. मात्र, त्यांचे हे समाधान व शेतीतील आर्थिक सुबत्ता मिळविण्याचे अमितचे स्वप्न अधिक काळ टिकले नाही. 29 नोव्हेंबरची रात्र अमितच्या स्वप्नांना उद्धवस्त करणारी ठरली. त्यादिवशी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने अमितने फुलविलेल्या शेतपिकाला आग लावली व शेतीपयोगी साहित्यही पेटवून दिले. यात अमितच्या शेतीचे व साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
डोळय़ात अश्रू ओघळले..
घटना समजताच अमित व त्याचे कुटुंब शेतीकडे पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी आग विझविली. मात्र, आगीत शेतीतील अनेक पिके होरपळली होती व शेतीपयोगी साहित्यही जळून गेले होते. अथक मेहनतीने तयार केलेली शेती अमित व त्याच्या कुटुंबाला उघडय़ा डोळय़ांनी नष्ट होताना पाहवी लागली. त्यांच्या डोळय़ात कष्टाचे अश्रू ओघळले. या घटनेची नोंद विजयदुर्ग पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
आत्मनिर्भरतेत ‘संरक्षण कवच’ मिळणार कधी?
कोरोना संकटात नोकरी, व्यवसाय बंद पडल्याने युवक, तरुणांना शासनाने आत्मनिर्भर बनण्यास सांगितले. युवावर्गाला शेतीकडे वळण्याचा सल्लाही शासनाने दिला. अमित हादेखील आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी धडपड करत होता. कर्ज घेऊन त्याने आधुनिक शेतीसाठी पैसा खर्च केला. मात्र, या आत्मनिर्भरतेत ‘संरक्षण कवच’ त्याच्याकडे नसल्याने तो पुरता हतबल झाला आहे. सरकारने अशा युवकांच्या पाठिशी ठामपणे राहिले पाहिजे. तसेच विनाकारण दुसऱयांचे नुकसान करणाऱया समाजकंटकांच्या प्रवृत्तीला अद्दल घडविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनीही दक्ष राहिले पाहिजे.









