हर्डी-कातळकडा येथील अपघात : दुचाकीस्वार राजापूर-भू बौध्दवाडीतील रहिवासी
वार्ताहर / राजापूर
राजापूर-आडिवरे-रत्नागिरी मार्गावर हर्डी कातळकडा येथे बुधवारी दुपारी दुचाकी दरीत कोसळून झालेल्या अपघातात भू बौध्दवाडी येथील गौरव मिलिंद जाधव (23) याचा मृत्यू झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव जाधव सेंटरीग कामानिमित्त राजापूरला आला होता. काम आटोपून भू येथे घरी जात असताना हर्डी कातळकडा येथे ताबा सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठडय़ावर आपटून सुमारे 25 फूट दरीत कोसळली. यामध्ये गौरव कातळावर जोराने आपटल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस हवालदार बबन जाधव, प्रमोद वाघाटे, सागर कोरे, गोवले आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून मृतदेह विच्छेदनासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान गौरवचा भाऊही या रस्त्यावरून जात असता घटनास्थळी दाखल झाल्याने गौरवची ओळख पटली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.









