बुधवारी 20 दुग्धवाहक गेले संपावर : शेतकरी, डेअरीसह ग्राहकांना फटका : डेअरीला रू. 14 लाखाची नुकसानी
प्रतिनिधी / फोंडा
दुधासारखी अत्यवाश्यक सेवा पुरविणाऱया गोवा डेअरीच्या काही दुग्धवाहकांच्या मनमानी कारभारामुळे काल बुधवारी राजधानी पणजीसह डिचोली, काणकोण, वेर्णा या भागात गोवा डेअरीचा दुध पुरवठा खंडीत झाला. दुग्धवाहू वाहनांच्या बेजबाबदार कृतीमुळे गोवा डेअरीला रू. 14 लाखाची नुकसानी सहन करावी लागली. याचा सर्वस्वी बोजा कबाडकष्ट करणाऱया दुध उत्पादकांवर पडत आहे. स्वत: हिरीरीने काम करणारे गोवा डेअरीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी काही कर्मचाऱयांसह फिल्डवर उतरून मडगांव भागात दुधपुरवठा केला. दुग्धवाहकांच्या या कृतीमुळे डेअरी, शेतकरी तसेच नियमित ग्राहकांना फटका बसल्याने या वाहकांना निलंबित करण्याची मागणी होत आहे.
प्राप्त माहितीप्रमाणे गोवा डेअरीत राज्यभरात दुधपुरवठय़ासाठी सुमारे 36 वाहने कार्यरत आहेत. त्यापैकी 20 वाहक कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक काल बुधवारी संपावर गेले. त्यामुळे सुमारे 2800 क्रेटसह 28 हजार लिटर दुध विनावितरीत डेअरी प्लांटात पडून राहिले.
गोवा डेअरीच्या दुग्धवाहू वाहनांच्या या कृतीमुळे डेअरी संलग्न शेतकऱयांनी प्रचंड असंतोष व्यक्त केला आहे. गोवा डेअरीच्या दुधावर अवलंबून असलेल्या ग्राहकांवरही परिणाम होत आहे. डेअरीतील दुग्धवाहू वाहने, डेअरीचे कर्मचाऱयांना कोणताही फरक पडत नसून केवळ काबाडकष्ट करून दुध उत्पादन करणाऱया शेतकऱयांना प्रत्येकवेळी फटका सोसावा लागतो ही वस्तूस्थिती आहे.
बेजबाबदारांवर कारवाई होणारच! -अध्यक्ष शिरोडकर
या मनमानी कारभाराची दखल घेत अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी स्वत: वाहनांची सोय करून फिल्डवर उतरून मडगांव शहरात दुध पुरवठा केला. संपावर असलेली काही दुग्धवाहू वाहने डेअरीच्या आवारात पार्क करुन ठेवण्यात आली होती.
पूर्व कल्पना न देता दुग्धवाहकांची कृती : शिरोडकर
याप्रकरणी अध्यक्ष शिरोडकर यांच्यांशी संपर्क साधला असता दुग्धवाहकांनी यासंबंधी कोणतीही पूर्व कल्पना दिली नसल्याची माहिती दिली. कुळे दुग्धवाहनासाठी ई-टेंडरिंगनुसार नवीन वाहनाची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी या रूटावर वाहन चालविणाऱयाचा हिशेबही चुकता करण्यात आला. तसेच त्यांनी यासंबंधी लेखी पत्रकातून कोणतीही हरकत नसल्याची मान्यता दिली असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
गोवा डेअरीत मागील काही वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या तसेच या कृतीत सामील असलेल्या वाहनांवर कारवाई होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. राज्यभरात गोवा डेअरीचा दुध पुरवठा सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे. याप्रकरणी दुग्धवाहकांची अशी कोणती अडचण होती ज्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरविणाऱया वाहनांना असा पवित्रा घ्यावा लागला याचे कारण समजू शकलेले नाही तसेच त्याच्यांशी संपर्कही होऊ शकलेला नाही.









