हत्यारांचा धाक दाखवून रोकड, दागिने लंपास
प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील खंडेराजुरी येथे मळाभागात राहणाऱ्या शेतकरी महिलेच्या घरावर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून रोकड आणि दागिने असा ४६ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत अक्काताई बाळासाहेब यादव (वय ७५) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
दरोडेखोरांनी दगडफेक करून दरवाजा फोडला. काठीने मारहाण करून तसेच धारदार हत्यारांचा धाक दाखवून दहशत माजवली. रोख दोन हजार रुपये आणि ४४ हजारांचे दागिने असा ४६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात अक्काताई यांचे पती बाळासाहेब धोंडिबा यादव हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी पाहणी केली. दरोडेखोर अज्ञात आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मळाभागात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.








