उद्यापासून मोहीम ; आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती
प्रतिनिधी / सांगली
महापालिका क्षेत्रात अनेक वाहने रस्त्यांवरच महिनोंमहिने पडून असतात. त्यांना कुणी वाली आहे की नाही हेच समजत नाही. या धूळखात पडलेल्या वाहनांमुळे रस्ते वाहतुकीस अडचणीचे ठरत आहेत. याबद्दल सामान्या नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहे. त्यामुळे आतामहापालिकेनेच ही वाहने ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. ही मोहीम बुधवारपासून (ता. 16) हाती घेण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रात तीनही रस्त्यांवर विशेषकरुन सांगली शहरातील गावठाण भागात तसेच विश्रामबाग, वखारभाग, शंभर फुटी परिसरात मोठ्या संख्येने चार चाकी वाहने, दुचाकी वाहने रस्त्यावर अनेक दिवस उभी असलेली दिसतात. धुळीने भरलेली ही वाहने महिनोंमहिने वापरलेली नाहीत असे दिसून येते. त्यामुळे रस्त्यावर ही वाहने अडगळ ठरत आहेत. वाहतुकीस या वाहनांमुळे अडथळे येत आहेत. ही वाहने हलवण्यासंदर्भात यापुर्वीही प्रयत्न झाले आहेत. मात्र त्याला यश आले नव्हते.
मार्च महिन्यात तीनही शहरात अशा वाहनांचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये सुमारे 200 वाहने अनेक महिने पडून असलेली दिसून आली होती. त्यावेळी या वाहनांच्या मालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या अशी माहिती सहायक आयुक्त सहदेव काकडे यांनी दिली. लॉकडाऊनपुर्वीच ही वाहन जप्ती मोहीम राबवण्यात येणार होती. मात्र 24 मार्चपासून लॉकडाऊन चालू झाल्याने ही कारवाई होऊ शकली नाही. आता पुन्हा महापालिकेने अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत. त्यामुळे वाहन मालकांनी आपले वाहन काढून घ्यावे अन्यथा वाहने ताब्यात घेतल्यानंतर त्याबद्दल तक्रार घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे.








