मंडणगडच्या आरोग्य विभागाचे पाचजण बालंबाल बचावले, वाहतुकीचा अर्धातास खोळंबा
प्रतिनिधी / खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मारूती सुझुकी बलेनो कारने अचानक पेट घेवून जळून खाक झाली. कारमधील मंडणगडच्या आरोग्य विभागाचे पाचजण तातडीने बाहेर पडल्याने बालंबाल बचावले. महामार्गावर अर्धातास वाहतुकीचा खोळंबा झाला.
मंडणगड आरोग्य विभागातील राम देवजी रांगडे, सुलोचना पाडवी, वनती फुलाजी गावित, भेकस व चालक गावित आदी कर्मचारी एमएच / एएन ४६६८ या क्रमांकाच्या बलेनो कारमधून कार्यालयीन कामासाठी रत्नागिरी येथे जात होते. भोस्ते घाट चढत असताना कारने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत कारमधील पाचही कर्मचारी सुखरूप बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. कारला आग लागल्याची खबर पोलीस स्थानकात देण्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली. तातडीने नगरपरिषदेचा अग्निशमक बंब देखील दाखल झाला.
अग्निशमक केंद्रातील शाम देवळेकर, दीपक देवळेकर, पियुष माने, वाहनचालक गजानन जाधव यांच्यासह मदतकर्त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीत कार जळून भस्मसात झाली. या घटनेमुळे महामार्गावरून धावणारी वाहतूक अर्धातास विस्कळीत झाली. आग विझवल्यानंतर सुरुवातीला खबरदारी म्हणून एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला. यानंतर दुहेरी वाहतूक सुरू होताच रखडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.









