विदेशींना पोलिसांची खबरदारीची सूचना
वृत्तसंस्था/ अबूजा
नायजेरियात दोन भारतीयांचे अपहरण करण्यात आले आहे. दोन्ही अपहृत भारतीय इबादान औषध कंपनीचे कर्मचारी आहेत. कंपनीतून रविवारी परतताना काही जणांनी त्यांचे अपहरण केले आहे. अपहरणापूर्वी भारतीयांच्या गाडीचे मागील चाक काढून टाकण्यात आले होते, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. अपहृत भारतीयांची नावे मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.
अपहृत भारतीयांचा शोध घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी अपहृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. अन्य विदेशी नागरिकांनी खबरदारी बाळगावी. संशयास्पद हालचाल आढळल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन दक्षिण-पश्चिम नायजेरियाच्या पोलीस विभागाचे प्रवक्ते ओलुगबेंगा फादेयी यांनी केले आहे.
नायजेरियात शेकडो भारतीयांचे वास्तव्य असून ते तेथील औषध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. भारतीयांसह अन्य देशांच्या लोकांचे तेथील स्थानिक सशस्त्र समूह अपहरण करत असतात. संबंधितांच्या कुटुंबांकडून खंडणी उकळण्यासाठी अपहरण केले जाते. रक्कम मिळताच अपहृतांची मुक्तता केली जाते.









