अमेरिकेने उचलले पाऊल : पुढील आठवडय़ात आपत्कालीन वापराची अनुमती मिळण्याची अपेक्षा
अमेरिकेच्या प्रशासनाने मॉडर्ना कंपनीच्या लसीच्या 10 कोटी अतिरिक्त डोसची मागणी केली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात अमेरिकेने मॉडर्ना कंपनीकडून 1 लाख डोस खरेदी केले होते. अमेरिकेने एकूण 30 कोटी अतिरिक्त डोस खरेदी करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. प्रत्येक रुग्णाला दोन डोसची गरज भासणार आहे. या हिशेबाने 15 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.
अमेरिकेची लोकसंख्या सुमारे 33 कोटी आहे. याचाच अर्थ अमेरिकेने निम्म्या लोकसंख्येसाठी लसीची व्यवस्था केली आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने एमआरएनए-1273 लसीचे अतिरिक्त 10 कोटी डोसची मागणी केल्याची माहिती मॉडर्ना कंपनीने दिली आहे. कंपनी आतापर्यंत मिळालेल्या ऑर्डर्सनुसार 20 कोटी डोसचा पुरवठा करणार आहे. पुढील पुरवठा एप्रिलपर्यंत होण्याची अपेक्षा आहे.
फायजरला मंजुरी
पहिल्या तुकडीतून 2 कोटी डोस डिसेंबरच्या अखेरपर्यंत दिले जाणार आहेत. याचा पुरवठा लसीच्या आपत्कालीन वापराची मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत रखडला आहे. युएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननुसार पुढील आठवडय़ात मंजुरी मिळू शकते. तर फायजरच्या लसीला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.
अमेरिकेकडून आर्थिक मदत
मॉडर्ना कंपनीने अद्याप कराराची रक्कम जाहीर केलेली नाही, परंतु प्रशासनाने लस खरेदीसाठी मॉडर्नाला एकूण 40 कोटी डॉलर्स (2900 कोटी रुपये) दिल्याचा दावा अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी केला आहे. लसीने चाचण्यांमध्ये 94.1 टक्के प्रभावोत्पादकता दर्शविल्याचे मॉडर्नाने 30 नोव्हेंबर रोजी जाहीर केले होते. कंपनीने अमेरिकेसह कॅनडा, जपान, इस्रायल, स्वीत्झर्लंड, कतार, ब्रिटन आणि युरोपीय महासंघासोबत सुमारे 39 कोटींहून अधिक डोसचा पुरवठा करण्याशी संबंधित करार केला आहे.









