विकास आराखड्यास तत्वतः मान्यता, पहिल्या टप्प्यात 25 कोटींच्या तरतुदीचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी
राज्यात गवारेड्यांसाठी प्रसिद्ध असणार्या राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्याच्या पर्यटन विकास आराखड्यास 110 कोटी रुपयांची तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील कामाकरिता 25 कोटी रुपयांचीही तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात मागणी केली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी वर्षा निवासस्थानी बैठक झाली.
पश्चिम घाटातील अतिसंवेदनशील क्षेत्र असलेल्या व जैवविविधतेने नटलेला परिसर म्हणून युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्याची नोंद आहे. या अभयारण्याचा पर्यटनदृष्टÎा विकास करण्याकरिता आमदार प्रकाश आबिटकर पाच वर्षांपासून प्रयत्न करत आहे. बैठकीत आमदार प्रकाश आबिटकर यांनी दाजीपूर अभयारण्याच्या विकासाकरिता विविध मागण्या केल्या. यामध्ये प्रामुख्याने हत्ती महल येथे हत्ती सफारी सुरू करणे व परिसर सुशोभित करून साठमारी तेथे संग्रहालय करणे व ध्वनी प्रक्षेपण करणे, राधानगरी धरण येथे नौकाविहार सुविधा करणे व जेठी बांधणे, राऊतवाडी, रामनवाडी धबधबा परिसर सुशोभीकरण करणे, राधानगरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) रिसॉर्ट बांधणे, बेनजीर व्हिला परिसर सुशोभित करून लेझर शो व बोटिंग सुविधा निर्माण करणे, राधानगरी व काळम्मावाडी धरण येथे गार्डन उभारणे व लाईट शो करणे, शिवगड किल्ला दुरुस्त करणे, अभयारण्यातील दुर्मीळ वनस्पती, पशु-पक्षी व प्राण्यांवर संशोधनासाठी केंद्र उभारणे, पर्यटकांकरिता बस खरेदी व इतर वाहनांची व्यवस्था करणे, अभयारण्य परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, माळेवाडी येथे नौकाविहार सुविधा निर्माण करणे, दाजीपूर येथे तंबू निवास, वन विश्रामगृह, डॉरमेंट्री, कॅनोपे वॉक तयार करणे, राधानगरी अभयारण्यातील गाईड व वाहन चालकांसाठी प्रशिक्षण देणे यासह विविध मागण्या केल्या.
यावेळी उपस्थित पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, दाजीपूर येथील MTDC चे रिसॉर्ट तत्काळ पूर्ण करण्याच्या व त्याकरिता आवश्यक तो निधी देण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना दिल्या आहेत. तसेच पर्यटन विकासाकरिता करण्यात येणारा विकास आराखडÎामध्ये पर्यटन विभाग व वन विभागाच्या अधिकाऱयांनी समन्वय राखून प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बैठकीस राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सचिव वने मिलिंद म्हैसकर, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक अभिजित सिंग, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद नार्वेकर तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक रामबाबू, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेंझ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे संचालक समाधान चव्हाण, वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी विशाल माळी यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या सूचना
– अभयारण्यातील अंतर्गत रस्ते वन्यजीवांना त्रासदायक ठरणार नाहीत अशा पद्धतीने विकसित करावेत
-पर्यटकांसाठी,वनदर्शनासाठी इलेक्ट्रिक बस घेण्यात यावी
– स्थानिक युवकांना गाईडचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा
– स्थानिकांना रोजगार मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष द्या