बनावट प्रमाणपत्रांचे धागेदोरे लांजापर्यंत ? तालुक्यातील कामही होते संशयास्पद
प्रतिनिधी/लांजा
बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणार्या परभणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत संतोष गोपीनाथ कठाळे यांना नागपूर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. संतोष कठाळे यांनी यापूर्वी लांजा येथे पोषण आहार अधिक्षक व गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले होते.
कठाळे यांच्या अटकेने बनावट प्रमाणपत्रे व शिक्के प्रकरणाचे धागेदोरे लांजातही असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कठाळे हे लांजा तालुक्यात शालेय पोषण आहार अधिक्षक पदावर कार्यरत होते. नंतर त्यांनी लांजा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला होता. काहीकाळ गटविकास अधिकारी पदाचाही चार्ज त्यांच्याकडे होता. तत्कालीन कालखंडात त्यांचे कामकाज संशयाच्या भोवर्यात होते.
राज्यात बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणार्यांची टोळी कार्यरत असल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर नागपूर येथील मानकापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासातून नागपूर पोलिसांनी संतोष कठाळे यांना त्याच्या राहत्या घरून अटक केली. झडतीमध्ये पोलिसांना कठाळे याच्या घरात अनेक बनावट प्रस्ताव, वेगवेगळ्या क्रीडा कार्यालयांचे तब्बल 17 बनावट शिक्के, नोंदी असलेली रजिस्टर्स, प्रमाणपत्रांच्या याद्या, कोरे धनादेश, सह्या केलेली व काही कोरी क्रीडा प्रमाणपत्रे आढळून आली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक लातूर; औरंगाबाद, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अशा अत्यंत महत्त्वाच्या कार्यालयांचे बनावट शिक्के यावेळी पोलिसांना आढळून आले आहेत.
Previous Articleअमेरिकेत ‘फायझर-बायोएनटेक’ लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी
Next Article गणपतीपुळे समुद्रात रिफ बांधण्याचा विचार









